Join us  

मोत्याचे दागिने काळे पडले? दागिन्यांनी चमक कायम राहण्यासाठी ५ टिप्स...दागिने चमकतील नव्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 12:39 PM

How To Take Care Of Pearls Jewelry : मोत्याचे दागिने कायम नवीन दिसावेत यासाठी सोप्या टिप्स...

ठळक मुद्देमोत्याचे दागिने कायम नव्यासारखे दिसावेत यासाठी काही सोप्या टिप्सदागिन्यांची योग्य ती काळजी घेतली तर ते चमकदार आणि नव्यासारखे दिसतात नाहीतर त्याची मजा जाते

सणवार किंवा लग्नसराई म्हटलं की दागिन्यांशिवाज मजा नाही. हातात, कानात, गळ्यात घालण्यासाठी विविध प्रकारचे दागिने महिला वर्गात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सोन्याच्या, खड्यांच्या किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांचा कितीही ट्रेंड असला तरी पारंपरिक मोत्याच्या दागिन्यांत खुलून येणारे सौंदर्य वेगळेच. लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्या वयोगटात आवडीने घातले जाणारे मोत्याचे दागिने चमकदार असतील तरच खुलून येतात (How To Take Care Of Pearls Jewelry). 

पण या दागिन्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर हे मोती काळपट पडतात आणि त्याची चमक कमी होते. सोन्याचे किंवा इतर दागिने आपण पटकन उचलून कुठेही ठेवू शकतो. पण मोत्याच्या दागिने ठेवताना आणि वापरुन झाल्यावर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मोत्याची नथ, चिंचपेटी, बांगड्या, गळ्यातले सेट, कानातले अशा दागिन्यांची चमक कायम ठेवायची तर आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ५ टिप्स पाहूया...

(Image : Google)

१. रासायनिक पदार्थांपासून ठेवा दूर

अनेकदा आपण अत्तर, परफ्यूम किंवा सौंदर्यप्रसाधनांवर दागिने घालतो. या रासायनिक घटकांशी मोत्यांचा संपर्क आल्यास ते काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींपासून मोत्याचे दागिने दूर राहतील असे पाहा. 

२. मऊ कापडाने पुसा 

मोत्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कापूस किंवा अतिशय मऊ कापड वापरा. कारण मोत्यावर लगेचच चरे पडू शकतात. त्यामुळे या दागिन्यांची ग्लेझ कमी होण्याची शक्यता असते. 

३. ठेवताना काळजी घ्या

मोत्याचे दागिने प्लास्टीकची डबी किंवा एकदम बंद राहतील अशाठिकाणी ठेवू नका. मोती जास्त कोरडा पडला तर तो खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोत्याचे दागिने सुती कापडात एखाद्या मऊ अशा पर्समध्ये किंवा मलमलच्या कापडात ठेवावेत. 

(Image : Google)

४. दागिने काढल्यावर आवर्जून करा या गोष्टी

अनेकदा आपल्याला घाम येतो, दागिन्यांवर धूळ बसते, त्याला कुंकू किंवा इतर कसले डाग पडतात. अशावेळी दागिने काढल्यानंतर ते कापसाने किंवा मऊ कापडाने पुसून मगच कपाटात ठेवावेत. मोत्याला शक्यतो पाणी लागू द्यायचे नाही. 

५. वर्षातून एकदा हे कराच

आपण सगळे दागिने नियमितपणे वापरतोच असे नाही. अशावेळी काही दागिने कपाटात अनेक दिवस तसेच राहतात. मात्र हे दागिने काही महिन्यांनी काढून मोकळ्या हवेत ठेवा. तसेच वर्षातून एकदा त्याला पॉलिश करुन आणा. म्हणजे ते कायम नव्यासारखे दिसतील.  

टॅग्स :फॅशनदागिने