साडी आणि स्त्रियांचे अतूट नाते असते. साडी हे महिलांसाठी केवळ एक प्रकारचे वस्त्र नसून त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. बदलत्या काळानुसार साडीची फॅशन देखील बदलत असते. स्त्रियांच्या वॉर्डरोबमध्ये कांजीवरम, पटोला, सिल्क, कॉटन अशा असंख्य प्रकारच्या साड्या पहायला मिळतात. यापैकीच सध्या सिक्वेन्स साडी फॅशन ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक ना एक तरी सिक्वेन्स साडी ही असतेच. सिक्विन साडी नेसल्याने लूकही खूप क्लासी दिसतो. त्यामुळे या साडीची रचना बहुतांश महिलांची पहिली पसंती असते.
कोणताही कपडा घातल्यानंतर तो धुणे आवश्यक आहे, जेणेकरून कपड्यावरील डाग आणि दुर्गंधी दूर होईल. त्याचप्रमाणे, साडी देखील वेळोवेळी धुवून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, परंतु आपण सर्व साड्या एकाच प्रकारे धुवू शकत नाही. काही साड्यांचे प्रकार असे असतात की जे धुताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. काही साड्यांवरचे हँडवर्क, डिजाईन, नक्षीकाम, धागावर्क हे इतके नाजूक असते की अशा साड्या धुताना त्या अतिशय काळजीपूर्वक धुवाव्या लागतात. सिक्वेन्स साडीवरील वर्क हे देखील अतिशय नाजूक प्रकारातील असते त्यामुळे या साड्या नेमक्या कशा धुवून स्वच्छ ठेवाव्यात ते पाहूयात. सिक्विन साडी धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून साडी खराब होणार नाही(How to wash & maintain your precious Sequins Sarees).
१. सिक्विन साड्या मशीनमध्ये धुवाव्यात का ?
आपण अनेकदा विसरतो की आपले सर्वच कपडे मशीनने धुण्यायोग्य नसतात. अतिशय नाजूक वर्क असलेले कपडे किंवा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याने काहीवेळा खराब होतात. यामध्ये सिक्वेन्स साडीचाही समावेश आहे. जर आपण सिक्विन साडी घरी धुत असाल तर यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करु नका. सिक्विन साडी हातानेच धुतली पाहिजे. यामुळे साडीवरील सिक्वीन्स खराब होत नाहीत.
२. सिक्विन साडी धुण्यासाठी पाणी कसे वापरावे ?
सिक्विन साड्या धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. या प्रकारच्या साड्या धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. गरम पाणी वापरल्याने सिक्विन साडीवरील डिजाईन लवकर खराब होण्याची शक्यता असते. फक्त सिक्विनच नाही तर गरम पाण्याने धुतल्याने इतर प्रकारचे फॅब्रिकही खराब होते. ज्यामुळे साडी फाटू शकते. यासाठीच चुकूनही गरम किंवा कोमट पाण्याने साडी धुवू नये. शक्यतो थंड पाण्याचा वापर करावा.
३. सिक्विन साडी धुण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ?
१. सिक्विन साडी धुण्यासाठी आपण सौम्य डिटर्जंट किंवा वॉशिंग सोल्यूशनचा वापर करु शकतो. सिक्विन साडी धुण्यासाठी साबण वापरु नये. चुकूनही साडीवर साबण घासू नये यामुळे साडीवरचे वर्क खराब होण्याची शक्यता असते. २. सिक्विन साडीला सौम्य सोल्युशन आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवावे.३. शेवटी साडी स्वच्छ पाण्याने धुवा. ४. साडी धुताना ती ब्रशने घासू नका किंवा चोळू नका. फक्त वाहत्या पाण्याखाली ठेवा.
४. सिक्विन साडी कशी सुकवायची ?
१. सिक्विन साडी सुकविण्यासाठी वॉशिंग मशिनच्या ड्रायरचा वापर करु नका. यामुळे आपली संपूर्ण साडी खराब होईल. २. साडी सावलीत किंवा पंख्याच्या हवेखाली वाळवा. ३. साडी वाळण्यासाठी दोरीवर न लटकवता त्याऐवजी, ती टेबलावर पसरुन वाळत घाला.
"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...
५. सिक्विन साडीवरील डाग कसे काढायचे ?
साडीवर कुठेतरी डाग पडला असेल तर संपूर्ण साडी धुवू नये. त्याऐवजी, फक्त डाग असलेली जागाच स्वच्छ करावी. तसेच डाग साफ करण्यासाठी ब्लीचसारख्या कठोर रासायनिक उत्पादनांचा वापर करु नये. त्याऐवजी लिंबू आणि बेकिंग सोडा या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा.
६. सिक्विन साडी कशी स्टोअर करुन ठेवावी ?
सिक्विन साडी कपाटात ठेवण्यापूर्वी ती व्यवस्थित फिक्स करा. फिक्सिंग करताना, साडीवरील टिकलीचे अनुक्रम एकमेकांना चिकटलेले नाहीत हे सर्वात आधी तपासून घ्यावे. आता सिक्विन साडी एका पेपरमध्ये दुमडून ठेवा.