Join us

कपड्यांच्या प्रकारानुसार करा ज्वेलरीची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिवाळीत दिसाल सुंदर-देखण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2023 17:55 IST

Know How To pair Fabric and jewellery : फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यांनी दिलेल्या काही खास फॅशन टिप्स...

दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण. या सणाच्या निमित्ताने आपण भरपूर खरेदी करतो. नातेवाईक, मित्रमंडळींना भेटतो. एकमेकांकडे फराळाला जातो. अशावेळी साहजिकच आपण नवीन कपडे आणि दागदागिने घालतो. आपण सगळ्यांमध्ये उठून आणि वेगळे दिसावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण कोणत्या प्रकारच्या कपड्यांवर कसे दागिने घालावेत हे मात्र आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याकडे अतिशय चांगले कपडे आणि दागिन्यांचे विविध प्रकार असूनही ते योग्य पद्धतीने पेअर न केल्याने आपला लूक म्हणावा तितका उठून येत नाही. मात्र कोणत्या प्रकारच्या कपड्यांवर कसे दागिने चांगले दिसतील याची थोडी माहिती घेतली तर आपण नक्कीच फॅशनेबल दिसू शकतो. पाहूयात यासाठीच फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यांनी दिलेल्या काही खास फॅशन टिप्स (Know How To pair Fabric and jewellery)...

१. तुम्ही अॅबस्ट्रॅक्ट पेंट असलेली साडी किंवा ड्रेस घातला असेल तर त्यावर कॉन्टेम्पररी म्हणजे थोडी जुन्या काळात वापरली जाणारी ज्वेलरी अतिशय छान दिसते. यामुळे तुम्ही एकप्रकारचा रेट्रो लूक मिळवू शकता आणि सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता. 

२. तुमचा ड्रेस किंवा घागरा वर्कचा असेल म्हणजेच त्यावर गोटापट्टी किंवा मिरर वर्क असेल तर त्यावर कुंदन ज्वेलरी अतिशय छान उठून दिसते. कपड्यांवरच्या चमकणाऱ्या गोष्टी आणि ज्वेलरीतील कुंदन एकमेकांवर छान मॅच होत असल्याने आपण आकर्षक दिसू शकतो. 

३. सॅटीनचे कपडे असतील तर त्यावर डायमंड प्रकारातील ज्वेलरी पेअर करायला हवी. हे दोन्ही एकमेकांवर अतिशय खुलून येतात. 

४. ऑरगँझा या नव्या प्रकारातील साडी किंवा ड्रेस असेल तर त्यावर मोत्याची ज्वेलरी अतिशय छान दिसते. 

५. सिक्विन प्रकारातील थोडी चमचमती साडी असेल तर त्यावर डायमंडची ज्वेलरी मस्त खुलून येते. सिक्विन हे आधीच खूप चमचमते असल्याने यावर जास्त ज्वेलरी न घालता फक्त कानातले घातले तरी चालतात. 

६. कपड्यांवर ब्लॉक प्रिंट प्रकारातील प्रिंट असेल तर त्यावर सिल्व्हर किंवा ऑक्सिडाईज प्रकारातील ज्वेलरी छान दिसते.  

 

टॅग्स :दिवाळी 2023फॅशनदागिनेमेकअप टिप्स