संक्रांतीचा सण म्हणजे महिलांसाठी एकमेकांकडे हळदीकुंकवाला जाणे, वसा देणे, वाणाची देवाणघेवाण असा एकूणच गडबडीचा दिवस असतो. महिला या दिवशी आवर्जून नातेवाईक, सोसायटीमध्ये आणि ओळखीच्यांकडे हळदीकुंकवाला जातात. त्यातही एखादीचे लग्न झाल्यानंतरचे पहिले हळदीकुंकू असेल किंवा बाळाचे पहिले बोरन्हाण असेल तर हे हळदीकुंकू मोठ्या उत्साहात केले जाते. अशावेळी एकमेकांकडे जाताना आपण छान आवरुन जातो. संक्रांत म्हणजे काळे कपडे असे गणित असल्याने या दिवशी आवर्जून काळे कपडे घातले जातात. काळा रंग हा कोणावरही खुलून दिसत असल्याने काळे कपडे घातल्यावर फारसे आवरले नाही तरी चालते. काळी साडी, ड्रेस, अनारकली ड्रेस असे कपडे घालताना त्यावर कशा पद्धतीने आवरलेले चांगले दिसेल हे समजून घ्यायला हवे. पाहूयात संक्रांतीसाठी आवरताना लक्षात घ्यायला हव्यात अशा गोष्टी (Makar Sankranti haldikunku how to be ready 3 makeup tips)...
१. मेकअप
काळ्या कपड्यांवर खूप जास्त मेकअप केला तर तो चांगला दिसत नाही. त्यामुळे अगदी कमीत कमी मेकअप करायला हवा. यातही काजळ किंवा लायनर लावावे. ब्लश, हायलायटर हे खूप वेगवेगळ्या रंगाचे लावले तर ते काळ्या रंगाच्या कपड्यांवर अंगावर येऊ शकते. त्यामुळे संक्रांतीच्या हळदीकुंकवाला जाताना कमीत कमी मेकअप केलेला केव्हाही जास्त चांगला.
२. दागिने
आपण घालत असलेले काळे कपडे कशा प्रकारचे आहेत त्यानुसार दागिन्यांची निवड करायला हवी. साडी किंवा ड्रेस खूप प्लेन असेल तर ऑक्सिडाईजचे, मोत्याचे असे थोडे हेवी दागिने घालू शकतो. पण कपड्यांवर वर्क किंवा डिझाईन असेल तर अगदी साधे लहान आकाराचे दागिने घालायला हवेत. तरच लूक चांगला दिसू शकतो.
३. लिपस्टीक निवडताना
काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आपण नकळत गोरे आणि उठून दिसतो. त्यामुळे डोळे, ओठ यांना खूप जास्त मेकअप करण्याची आवश्यकता नसते. एरवी आपण थोडी गडद रंगाची लिपस्टीक लावतो. यामध्ये लाल, गुलाबी, जांभळी, ब्राऊन अशा शेडसचा समावेश असण्याची शक्यता असते. पण काळ्या कपड्यांवर थोडी हलक्या रंगाची लिपस्टीक लावायला हवी. यामध्ये न्यूड शेड, थोड्या फिक्या शेडस असतील तर जास्त चांगले दिसते.