श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे, ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करायचे असते. मंगळागौर म्हणजे सगळ्या महिला एकत्र येऊन, छान नटून - थटून मंगळागौरीची पूजा व काही खेळ खेळून अगदी धम्माल करतात. श्रावणात साजरा केल्या जाणाऱ्या या मंगळागौरीच्या सणाची महिला वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. मंगळागौरीला आजूबाजूच्या महिला एकत्र येत नवविवाहितेचं कोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.
खरं पाहायला गेलं तर प्रत्येक सण हा महिलांसाठी खासच असतो, परंतु मंगळागौर हे त्यांच्यासाठी स्पेशल आहे. मंगळागौर खेळण्यासाठी तयार होताना सगळ्याचजणी आपल्या साडी आणि दागिन्यांवर अतिशय बारकाईने लक्ष देऊन असतात. आपल्याकडे दागिने आणि भरजरी साड्या हा महिलांचा प्रांत मानला जातो. या दोनच गोष्टींमध्ये प्रत्येक स्त्रीचा जीव अडकलेला असतो. आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार आपल्या ठेवणीच्या दागिन्यांमध्ये हवेत असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतंच. प्रत्येक समाजाला एक पारंपरिक, धार्मिक अशा काही विशिष्ट गोष्टींचा वारसा लाभलेला असतो. दागिन्यांच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्राला एक पूर्वापार परंपरा लाभली आहे. काही पूर्वापार चालत आलेल्या पण आजही तितक्याच हौसेने वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांचा वापर करून आपण मंगळागौरीसाठी एकदम हटके तयार होऊ शकतो(Mangalagauri Special : Maharashtrian Traditional Jewellery).
मंगळागौरीसाठी तयार होताना कोणते दागिने घालावेत ?
१. लक्ष्मी हार :- लक्ष्मी हार गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यात सोन्याची पदके बसवलेली असतात. व या पदकांवर लक्ष्मी देवीचे चित्र कोरलेले असते. लक्ष्मी हारामध्ये एका सोन्याच्या साखळीत सोन्याची गोल पदके लावलेली असतात. तसेच काठपदराच्या साड्यांवर हा हार अगदी खुलून दिसतो.
२. चोकर :- आजकाल बाजारात चोकरचा ट्रेंड खूप प्रसिद्ध आहे. चोकर हा खास करून मोत्यांचा बनलेला असतो. हा दिसायला खूप अप्रतिम दिसतो. काठापदराच्या साडीवर शिवाय मॉडर्न कपड्यांवरही आपण चोकर वापरू शकता. चोकर हा स्त्रियांचा आवडता दागिना मानला जातो. चोकर हा गळ्यातील हार अनेक वर्षांपासून वापरला जाणारा दागिना आहे. मोत्याशिवाय आता हा दागिना ऑक्सिडाइज्ड स्वरूपात सुद्धा मिळतो.
३. बोरमाळ :- बोरांच्या आकारा सारखी दिसणारी ही मण्यांची माळ बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. बोरमाळ हा गळ्यात घालायचा दागिना आहे. बोरमाळ ही सोन्याची किंवा चांदीची अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्वी बायका एक सरीची बोरमाळ घालत असे पण आता बाजारात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरींची बोरमाळ मिळते.
४. तोडे :- तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्यांसारखाच असतो. हा दागिना बांगडयांपेक्षा ही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतात. या तोड्यांवर सुरेख असे बारीक नक्षीकाम केलेले असते. काठापदराच्या साडीवर हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यावर त्या स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते.
५. नथ :- महाराष्ट्रीयन स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण म्हणजे नथ. नथ मोत्याची ,खड्यांची व हिऱ्याची असते. नथीचे मुख्य दोन प्रकार असतात एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते.
६. बुगडी :- कानाच्या खालच्या पाळीबरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते. कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.
७. कुडी :- कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिद्ध झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६ ते ७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडय़ा या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडय़ांव्यतिरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल, सोन्याचे कान यांसारखी आभूषणेही कानात घातली जातात.
८. तन्मणी :- तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. याच्या मध्यभागी असलेल्या पदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात. त्यात दोन किंवा तीन सर असतात. हा दागिना मोत्यांच्या मण्यांत विणलेला असतो. पारंपारिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे. व काठपदराच्या साडीवर खूप शोभून दिसणारा हा दागिना आजच्या काळातही खूप प्रसिद्ध आहे.