Join us  

जान्हवी-मीरानंतर आता रेशीमगाठवाल्या नेहाच्या मंगळसूत्राची चर्चा, सुंदर-सिम्पल डिझाइनचा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 11:28 AM

Mazi Tuzi Reshimgath Neha Mangalsutra : पाहा काय आहे नेहाच्या मंगळसूत्रात खास...

ठळक मुद्देमालिकांनंतर बाजारात या प्रकारच्या मंगळसूत्रांना मोठी मागणी सुरू झाल्याचेही चित्र होते. त्याचप्रमाणे आता नेहाचे मंगळसूत्रही रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेहा आणि यशच्या लग्नासाठी चाहते खूप आतूर होते, अखेर हे लग्न झाले असून नेहाचा लग्नानंतरचा लूकही चाहत्यांना आवडत आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींचे लग्न झाले की त्यांचा लूक, लेहंगा, मेकअप या सगळ्या गोष्टींची भरपूर चर्चा होते. या चर्चेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांचे मंगळसूत्र. याचप्रमाणे टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांचीही फॅशनच्या जगतात जोरदार चर्चा असते. अजूनही बरसात आहे मधील डॉ. मीराच्या लहान मंगळसूत्राचा ट्रेंड बराच गाजला होता. त्यानंतर आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath)या मालिकेतील नेहा कामत - नेहा चौधरीच्या (Neha Mangalsutra Trend) मंगळसूत्राची चर्चा होताना दिसत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) नेहाची भूमिका करत असून तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. नेहा आणि यश म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyash Talpade) यांचे मालिकेत नुकतेच लग्न झाले आहे (Marathi Serial). 

नेहाने लग्नात आणि नंतरही मोठे आणि लहान अशी दोन मंगळसूत्र घातलेली दिसत आहे. मालिकेतील विशिष्ट पात्र आपल्याला आवडत असेल तर तिची कपड्यांची, केसांची, मेकअपची आणि दागिन्यांची स्टाईल फॉलो केली जाते. तसेच नेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र सध्या चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहे. महिलावर्गाला ज्वेलरीची विशेष भुरळ पडत असल्याने त्या बाजारात तसेच्या तसे मंगळसूत्र मिळते का याचा शोध घ्यायला लागतात. ज्वेलरी डिझायनरही मालिकांमधील डिझाइनप्रमाणे दागिने बनवण्याचा प्रयत्न करतात. नेहाच्या दोन्ही मंगळसूत्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रार्थना म्हणजेच नेहाने घातलेल्या मोठ्या मंगळसूत्रात २ सोन्याच्या चेन, मधे मधे काळे मणी आणि खाली खड्यांच्या २ वाट्या अशी डिझाइन आहे. तर गळ्याला बसणारे लहान मंगळसूत्र म्हणून तिने काळ्या मण्यांमध्ये ओवलेला मुहूर्तमणी घातला आहे.

 

धनश्री आर्ट ज्वेल असे इन्स्टाग्रामवर नाव असलेल्या डिझायनरने नेहाची ज्वेलरी डिझाईन केली आहे. प्रार्थनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिला टॅगही केले आहे. याआधीही ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीचे मंगळसूत्र, ‘तू सौभाग्यवती हो’ मधील लक्ष्मी मंगळसूत्र, ‘कारभारी लयभारी’ मधील पियुचे हटके मंगळसूत्र आणि ‘अग्गबाई सासूबाई’मधील शुभ्राचे मंगळसूत्र यांसारख्या बऱ्याच मालिकांमधील प्रमुख पात्रांनी घातलेली मंगळसूत्रे रसिकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकांनंतर बाजारात या प्रकारच्या मंगळसूत्रांना मोठी मागणी सुरू झाल्याचेही चित्र होते. त्याचप्रमाणे आता नेहाचे मंगळसूत्रही रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेतील परी म्हणजेच प्रत्यक्षातील मायराही कमी कालावधीत खूप प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर तर तिचे भरपूर फॉलोअर्स असल्याचे पाहायला मिळते. 

 

 

 

टॅग्स :फॅशनमेकअप टिप्स