गेले २ ते ३ वर्ष आपण सगळेच घरात अडकून होतो. कोरोना नावाच्या संकटामुळे सार्वजनिक जीवनावर अनेक बंधने आली होती. भारतीय संस्कृती ही सणवार आणि त्यांच्याशी निगडीत असल्याने या सगळ्या काळात आपण सगळ्यांनीच असंख्य गोष्टी मिस केल्या. मात्र यावर्षी पुन्हा एकदा सगळे जोमाने सुरू झाले असताना सोसायटींमध्ये किंवा अगदी मित्रमंडळींमध्ये मोठमोठ्या लॉनवर भरपूर गर्दीतही आपण गरबा एन्जॉय करायला जातो. गरबा किंवा दांडीया खेळणे हे जितके आनंदाचे असते तितकेच ते थकवणारेही असते. गरबा आणि दांडीया खेळायला जाताना आपण सगळ्यांमध्ये उठून आणि सुंदर दिसायला हवे यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. पण त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी मेकअप करताना किंवा तयार होताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी (Navratri Dandiya Garba Makeup Tips)...
१. कपडे निवडताना
गरबा किंवा दांडीयाला साधारणपणे हेवी वर्कचे कपडे घातले जातात. मात्र नाचून आपण खूप दमतो आणि नंतर हे कपडे आपल्याला नकोसे व्हायला लागतात. किंवा अनेकदा या कपड्यांमुळे अंगावर रॅश येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कपड्यांची निवड करताना जागरुक राहा. तसेच अनेकदा घोळदार कपडे असले तर आपण नाचताना पाय अडकून पडण्याची शक्यता असते, त्याची काळजी घ्या.
२. चपलेचा त्रास नको
एरवी आपण काहीशा हिल्सच्या चप्पल वापरत असू. किंवा एखादी फॅन्सी चप्पल वापरत असू पण गरबा किंवा दांडीया खेळताना अशाप्रकारचे फॅन्सी किंवा उंच टाचेच्या चपला घालून उपयोग नाही. त्यामुळे पायांना त्रास होण्याचीही शक्यता असते.
३. केस कसे बांधाल?
हल्ली अनेकदा आपण केस मोकळे सोडतो किंवा मोकळे राहतील अशी हेअरस्टाईल करतो. पण दांडीया किंवा गरबा खेळायला जाताना केस गळ्यात आले तर आपल्याला थोड्या वेळाने इरीटेट व्हायला लागते. अशावेळी केसांची एखादी छानशी वेणी किंवा पोनी टेल, बन अशी हेअरस्टाईल सोपी आणि सुटसुटीत होऊ शकते. त्यामुळे आपल्याला घामाचा त्रास तर होणार नाहीच पण आपण मनसोक्तपणे खेळू शकू.
४. मेकअप आणि दागिने
गरबा खेळणे ही एकप्रकारची दमवणारी अॅक्टीव्हीटी असते. गरबा खेळताना खूप जास्त मोठे आणि जड दागिने घातले तर खेळताना त्याचा अडथळा होऊ शकतो. तसेच खूप जास्त मेकअपही करु नये कारण अनेकदा घामाने मेकअप पसरतो किंवा त्यावर धूळ बसल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता असते.