Join us  

डेमी-फाईन ज्वेलरी म्हणजे काय? तरुण मुलामुलींच्या जगातला हा कोणता नवा इन ट्रेण्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 4:20 PM

New Trend of Demi Fine Jewelry : सोन्यासारखे दिसणाऱ्या पण सोनं नसलेल्या इकोफ्रेण्डली दागिन्यांचा नवा ट्रेण्ड

पल्लवी मोहाडीकर

फॅशन आणि स्टाईल कधीच 'आउटडेटेड' असून चालत नाही. सोन्याचे दागिने, अलंकार घालण्याची हौस आणि मौज वेगळीच असते. पण दैनंदिन आयुष्यात असे महागडे दागिने घालून वावरणे ना सोयीचे असते ना सुरक्षित. त्याऐवजी इमिटेशन ज्वेलरी वापरायची म्हटल्यास ती काही दिवसातच खराब दिसायला लागते किंवा त्याची मोडतोड होते. मग रोजच्या वापरासाठी सोन्यासारखी दिसणारी, सोन्यासारखा 'फील' देणारी आणि सोन्यासारखीच दीर्घकाळ टिकणारी अशी ज्वेलरी मिळू शकते का, असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल. तर त्याचे उत्तर आहे होय, अशी ज्वेलरी मिळू शकते. 

सोन्यासारखीच पण न्यू-एज गोल्ड म्हणून डेमी-फाईन या प्रकारची ज्वेलरी आता तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे. स्वस्तात मस्त, सोन्यासारखे दिसणारे आणि दररोज वापरता येण्यासारखे  दागिने म्हणजे डेमी फाईन ज्वेलरी.  डेमी-फाईन ज्वेलरी 'मिलेनियल्स'च्या म्हणजे ज्यांचा जन्म १९९०-२००० या दशकामध्ये झाला अशा तरुण मुला-मुलींच्या पसंतीस उतरत आहे. मौल्यवान धातू किंवा खड्यांपेक्षा अगदी स्वस्त पण दीर्घकाळ वापरता येईल असे दागिने बनविण्यासाठी स्टर्लिंग सिल्व्हर याचा बेस मेटल म्हणून वापर करण्यात येतो व त्यावर गोल्ड प्लेटिंग करून दागिने तयार केले जातात.

(Image : Google)

टिकायला मजबूत

आपण ज्या गोष्टी वापरतो त्याची निर्मिती कशी झाली आहे व त्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाचे कितपत नुकसान होते याबाबत मिलेनियल्स खूप संवेदनशील बनले आहेत. त्यामुळे शाश्वत आणि सर्वसमावेशक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या ब्रँड्सला ते पसंत करतात. कच्च्या मालाच्या आयातीपासून ते अंतिम उत्पादननिर्मितीच्या प्रक्रियेत ही काळजी घेतली जाते. डेमी-फाईन ज्वेलरीमध्ये असे स्रोत वापरले जातात व त्यामुळे ज्वेलरीचा उपभोग घेतानाच आपल्या वसुंधरेचे संवर्धन होत असल्यामुळे मिलेनियल्सकडून त्याला प्राधान्य दिले जात आहे. डेमी-फाईन ज्वेलरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डिझाईन्समधील सर्वसमावेशकता. विविध संस्कृती, शारीरिक ठेवण, व्यक्तिगत स्टाईल्सचा विचार करून व्यापक स्तरावर डिझाईन्सची निर्मिती केली जाते. त्यामुळे ग्राहकांना सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी डेमीफाईन ज्वेलरी अत्यंत उत्तम पर्याय ठरत आहे. 

(Image : Google)

कस्टमायझेशन

कोणत्याही प्रकारची फॅशन करताना त्यावर आपले नाव, दिनांक किंवा एखादा विशिष्ट मेसेज कोरला गेला तर ती गोष्ट आपल्यासाठी आयुष्यभराचा ठेवा बनते. अशा प्रकारच्या पर्सनल स्टोरीटेलिंगसाठी डेमीफाईन ज्वेलरी पूरक आहे. आपल्या आठवणी आणि भावनांना कायमस्वरुपी आपल्याजवळ ठेवणे त्यामुळे शक्य होते. व्यक्तिगत पातळीवर महत्त्वाच्या वाटणाऱ्या अशी ज्वेलरी मिलेनियल्सना अधिक भावते. या कस्टमायझेशनमुळे तरुणाईला व्यक्त होण्यात मदत होते. त्यातूनच प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि स्टाईलनुसार डिझाईन्स घडत जातात. अगदी मिनिमलिस्टपासून ते बोल्ड डिझाईन्स अगदी सहजपणे निर्माण करता येतात. या डिझाईन्स तरुणाईला आपल्या मूडप्रमाणे किंवा परिस्थितीनुसार वापरता येतात.

(लेखिका पल्मोनाज् कंपनीच्या सीईओ -सहसंस्थापक आहेत)

टॅग्स :फॅशनदागिने