कार्यक्रम, सणवार, उत्सव, पार्टी, सेलिब्रेशन हे सगळं तर वारंवार चालूच राहतं.. म्हणून मग दरवेळी नविन ड्रेस किंवा नविन साडी कशी काय आणणार... म्हणूनच तर अशा वेळी पैसे खर्च करण्यापेक्षा थोडीशी वेगळी ट्रिक करा... जुनीच साडी स्टायलिश पद्धतीने नेसली, तिच्यावरचे ब्लाऊज आणि दागदागिने यात जर बदल केला तर नक्कीच तुम्हाला वेगळा लूक मिळू शकतो.. म्हणूनच तर बघा साडी ड्रेपिंगच्या या स्टायलिश पद्धती...
१. या पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही नेहमीसारखी साडी नेसून घ्या, फक्त पदर थोड्या वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साडी नेसायची असेल, तर ब्लाऊज बॅक हूक असणारंच पाहिजे. निऱ्या घातल्यानंतर आपण साडीचा जो पदर पुढे आणतो तो निऱ्यांच्यावर पिनअप करा आणि तिथून तिरक्या दिशेने तो खांद्यावर घेऊन पिनअप करा. यामध्ये आपल्याला पदर फोल्ड करायचा नाही. तो खांद्यावर पिनअप करून तसाच हातावर सोडायचा आहे.
२. दुसऱ्या पद्धतीमध्ये निऱ्या घालेपर्यंत नेहमीसारखी साडी नेसून घ्या. निऱ्या घातल्यानंतर आपण उरलेला पदराचा भाग जसा एका बाजूने पुर्णपणे घेतो, तसा घेऊ नका. मागच्या बाजूने मध्यभागी तो खोचा. त्यानंतर पदराच्या प्लेट्स घाला. आणि उजव्या बाजूने पुर्णपणे सैलसर सोडून डाव्या खाद्यांवर पदर पिनअप करा...
३. आजकाल साडी विथ बेल्ट या प्रकाराची चांगलीच क्रेझ आहे. तुमच्याकडे असणाऱ्या साडीवर मॅचिंग बेल्ट लावला की तयार झाला तुमचा खास लूक. यासाठी नेहमीप्रमाणे साडी नेसा. पदराच्या प्लेट्स अगदी बारीक घ्या. डाव्या खांद्यावर पदर पिनअप केला की त्यावर एक मोठ्या आकाराचा छान बेल्ट लावा. बेल्ट नसल्यास एम्ब्रॉयडरी, कुंदन, मोतीवर्क केलेली मोठी लेस देखील छान दिसेल.
४. जॅकेटप्रमाणे वाटणारे ब्लाऊज आणि त्यावर उलट पदर घेतलेली साडी असा लूकही सध्या चांगलाच ट्रेण्डी आहे. अशा पद्धतीने साडी नेसायची असेल तर कॉलर असणारे आणि कंबरेपर्यंंत लांब आणि सैलसर असणारे ब्लाऊज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.