उन्हाळ्यात तिखटजाळ असे काहीही नको वाटते. जे खाण्यापिण्याचे तेच रंगांचे. स्पायसी उष्ण रंग नको वाटतात. कपडेही असे निवडावेसे वाटतात की त्या रंगांनी आपल्याला आणि इतरांनाही सुख वाटेल, शितल गारवा मिळेल. समर कलर्स म्हणून तर फार महत्त्वाचे असतात. निसर्गातही बघा असेच सुंदर उन्हाळी रंग दिसतात. तेच रंग आपल्या खाण्यापिण्यात, अंगावर आले तर आपलाही उन्हाळा सुखकर होईल.
उन्हाळ्यातल्या रंगांची जादू..१. आपल्या कळत नकळत पदार्थांची आणि कपड्यांच्या रंगसंगतीची गुंफण बांधली गेलीये. शेवटी सगळा नजरेचा खेळ आहे. रखरखीत उन्हाळ्यात नजरेला आणि त्याबरोबरच पोटाला थंड करणाऱ्या गोष्टींकडे आपला कल असतो. २. पांढरीशुभ्र लस्सी, रसरशीत पिवळ्या धमक लिंबाचं सरबत, आवळ्याची तुकतुकीत कांती हे सगळंच मोहून टाकणारं आहे. हे नजरेला आणि पोटाला सुखावणारे 'कूल कलर्स' अगदी हवेहवेसे वाटतात.
(Image : google)
३. उन्हाळ्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेल्या पांढरा, ऑफव्हाईट, पिवळा , हिरवा, गुलाबी अशा सरधोपट रंगांच्या यादीत सध्या एका सुंदर शांत रंगाची चर्चा आहे.४. लव्हेंडर म्हणजेच फिकट जांभळा तसेच गुलाबीसर जांभळा रंग. गुलाबी साडीचं रिल गुलाबीसर जांभळ्या रंगातही करता येऊच शकतं.५. शिफॉन, कॉटन जॉर्जेट, सिल्क यासारख्या सुळसुळीत कापडात लव्हेंडर रंग सुरेख दिसतो. तर लिनन कॉटन सारख्या कापडांवर हा रंग मॅच्युअर दिसतो.६. हा रंग हवाहवासा वाटला तरी तो कॅरी करणं तितकं सोप्पं नाहीये. अति वापरल्याने लव्हेंडर खुप भडक दिसू शकतो किंवा योग्य ती शेड ना वापरल्याने अगदी बोअरिंग आणि डल दिसू शकतो. लव्हेंडर बरोबरऑफ व्हाईट, व्हाईट यांची रंगसंगती सुरेख दिसते.
७. केसांवर लव्हेंडर स्ट्रीक खूप बोल्ड दिसतात. केसांच्या बन मधून किंवा पोनी तुन मधेच दिसणारी लव्हेंडर शेड मस्त हटके लुक देते. अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला हा रंग चांगला दिसेल की वाईट याचा विचार न करता बिंधास्त या रंगाचे कपडे, दागिने घाला. कॉन्फिडण्ट व्हा.