मे महिना म्हणजे लग्नसराई.लग्न म्हणजे मेहंदी, संगीीत, हळद असे एकाहून एक समारंभ. केवळ लग्नच नाही तर मुंज किंवा आणखीही समारंभांचे शुभमुहूर्त या काळात असतात. डोक्यावर तापते ऊन आणि त्यात समारंभाला जाणे म्हणजे काय घालावे हा प्रश्नच. मात्र घरातील किंवा जवळचे लग्न असल्यावर जावे लागणारच. कडक उन्हाळ्यात साध्या सुती कपड्यांनी शरीराची लाहीलाही होत असताना लग्नसमारंभाचे भरजरी कपडे घालणे म्हणजे शिक्षा वाटू शकते (Summer Special). यातही लग्न एन्जॉय करायचे असेल तर अंगावर साडी, मेकअप, हेअरस्टाईल नकोसे होते. मग आपण वैतागतो आणि थोडा वेळाने साधा एखादा ड्रेस घालतो. पण असे होऊ नये म्हणून उन्हाळ्यात लग्नासाठी तयार होताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात.
१. भरजरी कपडे
उन्हाळ्याच्या दिवसांत भर दुपारचे लग्न असेल तर शक्यतो त्यातल्या त्यात हलकी साडी नेसावी. ज्यामुळे आपल्याला खूप गरम होणार नाही. भरजरी शालू किंवा हेवी वर्क असलेल्या जाड कापडाच्या साड्यांमुळे नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. इतकेच नाही तर त्वचेवर हे कापड घासले गेल्याने त्वचेला पुरळ येणे, रॅशेस येणे अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे कपड्यांची निवड करताना काळजी घ्यावी
२. हलक्या कपड्यात राहाल जास्त कम्फर्टेबल
वजनाने हलक्या किंवा अगदी कॉटनच्या, शिफॉनच्या, खादी सिल्क, प्युअर सिल्क अशा साड्या वजनाने हलक्या असतात. उन्हाळ्यात लग्न असेल तर अशा साड्यांना पसंती द्यावी म्हणजे फार गरम होत नाही. एरवी आपण लेहंगा किंवा घोळदार मोठे ड्रेस घालतो तसे उन्हाळ्यात घातले तर गरमी सहन होत नाही. त्यामुळे असे कपडे टाळायला हवेत. तसेच साडीच्या आतला परकर कॉटनचा असावा म्हणजे त्वचेला त्रास होणार नाही.
३. स्लिव्हलेस किंवा कमी बाह्यांचे
एरवी आपण थ्री फोर्थ किंवा फूल स्लीव्हजच्या ब्लाऊजची फॅशन करु शकतो. पण उन्हाळ्यात शक्यतो स्लिव्हलेस ब्लाऊज किंवा ड्रेस घालावेत. ज्यामुळे काखेत सतत घाम येत नाही. असा घाम आल्यास त्याचे डागही दिसतात. त्यामुळे शक्यतो मोठ्या गळ्यांचे आणि स्लिवलेस किंवा लहान बाह्या असलेले कपडे निवडावेत.
४. मेकअप करताना
एरवी आपण थोडा हेवी मेकअप केला तरी चालतो. पण उन्हाळ्यात जास्त मेकअप केला आणि आपल्याला घाम आला तर चेहऱ्यावर त्याचे डाग खराब दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो हलका मेकअप करावा. तसेच मेकअपची उत्पादने वॉटर प्रूफ असतील तर आणखी चांगले जेणेकरुन घाम आला तरी मेकअप पसरणार नाही.
५. केसांच्या बाबतीत
केस मोकळे सोडले तर चांगले दिसतात त्यामुळे अनेकदा आपण लग्नसमारंभाला केस मोकळे सोडतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत केस मोकळे सोडले तर जास्त घामाघूम व्हायला होते. त्यामुळे केसांचा अंबाडा, बन बांधावा. सध्या वेणीची फॅशन असल्याने वेणी हाही एक उत्तम पर्याय हेअरस्टाईलसाठी करता येऊ शकतो.