प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन हिच्या सौंदर्याने देशातीलच नाही तर जगभरातील चाहते घायाळ होतात. मागील २० वर्षांपासून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर आपला ठसा उमटवत आहे. यंदा ऐश्वर्याचे रेड कार्पेटवरील हे २० वे वर्ष होते मात्र तिच्या सौंदर्यात तसूभरही फरक झालेला नाही. ऐश्वर्याने घातलेल्या फुलांची डिझाईन असलेला काळा गाऊन आणि गुलाबी रंगाचा फुलाच्या पाकळ्यांसारखी डिझाईन असलेल्या गाऊनने यंदा महोत्सवात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी ऐश्वर्याच्या हा खास ड्रेस तयार केला होता. अवघ्या २० दिवसांत आणि १०० लोकांच्या मदतीने हा ड्रेस तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अर्मागेड्डन टाइम या चित्रपटाच्या प्रकाशनप्रसंगी ऐश्वर्याने हा ड्रेस परिधान केला होता. गुलाबी रंगाच्या पाकळ्यांची डिझाईन असलेल्या या आगळ्यावेगळ्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
फुलाच्या खऱ्या पाकळ्या असाव्यात अशा पद्धतीच्या पाकळ्यांची डिझाईन असलेला हा ड्रेस ऐश्वर्यावर अतिशय सुंदर दिसत होता. ऐश्वर्याचे कान्समधील २० वे वर्ष असल्याने आपल्याला तिच्यासाठी काहीतरी खास डिझाईन करायचे होते असे गौरव या ड्रेसविषयी सांगताना म्हणाले. गेल्या काही वर्षात आपण सगळ्यांनीच अवघड परिस्थितीचा सामना केला असल्याने त्यामुळे आशा, जन्म आणि सौंदर्य असा मेसेज या गाऊनच्या माध्यमातून द्यायचा होता. इटलीचे प्रसिद्ध पेंटींग असलेल्या बर्थ ऑफ व्हिनसप्रमाणे काहीतरी करायचे डोक्यात होते. त्यामुळे या गाऊनला खांद्यावर कवचासारखे डिझाईन करण्यात आले होते. या कवचातून नव्या आशांचा उदय होत असल्याची संकल्पना यामध्ये होती.
या गाऊनच्या निर्मितीमध्य ऐश्वर्या पहिल्यापासून होती असेही गौरव यांनी सांगितले. ती रेड कार्पेटवर आल्यावर उपस्थितांकडून तिच्या नावाचा होणारा गजर आणि तिचे आरस्पानी सौंदर्य यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या ड्रेसला सिल्व्हर रंगाची किनार देण्यात आली होती. डायमंडचे कानातले आणि डोळ्यांना अतिशय साजेसा मेकअप आणि गुलाबी लिपस्टीक यामुळे ती आणखीनच खुलून दिसत होती. ऐश्वर्याचे सौंदर्य आम्हाला आहे त्याहून आणखी खुलवायचे असल्याने तिच्यासाठी वेगळे आणि खास काहीतरी करावे या विचाराने हा गाऊन तयार केल्याचे डिझायनर गौरव म्हणाले.