स्त्रियांच्या साजशृंगार करण्याच्या अनेक पद्धती व प्रकार आहेत. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आपण जितका साजश्रुंगार करु तितका कमीच आहे. स्त्रियांच्या साजश्रुंगार करण्यासाठी कानातले, बिंदी, पैंजण, बांगड्या, बाजूबंद, नेकलेस, अंगठ्या यांमध्ये असंख्य वैविध्य पाहायला मिळते. पारंपरिक, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या कपड्यांवर त्याला शोभेल अशीच ज्वेलरी आपण घालतो.काही लग्न समारंभ असला तर आपण भरजरी कपडे व त्यावर शोभतील असे भरजरी, शाही दागिने घालणे पसंत करतो. स्त्रियांच्या साजश्रुंगारामध्ये, कपाळावर शोभून दिसणाऱ्या बिंदीला फार महत्व आहे. लग्नसराईमध्ये स्त्रिया आपले सौंदर्य अधिक खुलून यावे यासाठी कपाळावर शोभेल अशी बिंदी अवश्य लावतात.
बदलत्या काळानुसार फॅशनही बदलली, कपाळावरील बिंदीची जागा आता माथापट्टीने घेतली आहे. सध्याच्या नववधू लग्नात सुंदर दिसण्यासाठी लेहेंग्यापासून ते ज्वेलरी, एक्सेसरीज व मेकअपपर्यंत सगळ्यांत लेटेस्ट फॅशन करणे पसंत करतात. हेड ज्वेलरीमध्ये सध्या माथापट्टी किंवा मांग टीका यांचा ट्रेंड सुरु आहे. माथापट्टीमध्ये, मल्टी लेयर माथा पट्टी, राजपूती माथा पट्टी, कुंदन माथा पट्टी, दक्षिण भारतीय माथा पट्टी असे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. माथापट्टी वापरल्याने नववधूचे सौंदर्य अधिकच खुलून येते. माथापट्टी लावताना ती व्यवस्थित फिट बसवावी लागते. नाहीतर ही माथापट्टी डोक्यावरून घसरून खाली पडण्याची शक्यता असते. माथापट्टी डोक्यावरून घसरून खाली येऊ नये व डोक्यावर फिट बसावी यासाठी एक सोपा उपाय पाहूया(Tricks & Hacks To Wear Mathapatti, 1 simple trick - the Mathapatti will fit perfectly).
माथापट्टी म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या काळी बिंदी ही केवळ कपाळावर डोक्याच्या बरोबर मध्यभागी लावली जायची. परंतु माथापट्टी ही एक लांब डिझायनर पट्टी असते. माथा म्हणजे कपाळावर, माथ्यावर लावली जाणारी पट्टी म्हणजेच माथापट्टी. ही पट्टी आपण डोक्यावर केसांमध्ये व्यवस्थित फिट बसवू शकतो. आजकाल माथापट्टीमध्ये भरपूर डिझाईन उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी कुंदन, चकाकणारे खडे, पांढरेशुभ्र मोती, अशा विविध गोष्टींचा वापर करून ही माथापट्टी सजविली जाते. बारीक नक्षीकाम केलेली नाजूक व हेव्ही स्टोन, बीड्स लावलेली अशा दोन्ही प्रकारांत माथापट्टी सजविली जाते. सध्या बऱ्याच वधू ही माथापट्टी लावून आपल्या सौंदर्यात अधिक भर घालण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट, कियारा अडवाणी यांसारख्या बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या लग्नांत माथापट्टी लावण्याचा ट्रेंड फॉलो केला होता.
माथापट्टी कशी लावावी?
१. सर्वप्रथम आपल्या आवडीची एक माथापट्टी निवडा. २. आता एक काळ्या रंगाचा इलॅस्टीक बँड घेऊन आपण जिथे माथापट्टी लावणार आहात त्या भागाचा अंदाज घेऊन तेवढ्या मापाचा इलॅस्टीक बँड कापून घ्यावा. ३. जिथे माथापट्टी लावणार आहात त्या भागाचा अंदाज घेतल्यानंतर त्या आलेल्या मापापेक्षा आकाराने थोडा छोटाच इलॅस्टीक बँड कापा. जेणेकरून, इलॅस्टीक बँड छोटा कापल्याने तो व्यवस्थित ताणून बसेल. पण जर आपण जास्त मापाचा मोठा इलॅस्टीक बँड घेतला तर इलॅस्टीक बँड ताणला न जाऊन लूज पडू शकतो.
४. आता माथापट्टीच्या दोन्ही हुकांना इलॅस्टीक बँडची दोन्ही टोक बांधून घ्या. इलॅस्टीक बँडने हुकांना गाठ मारताना लूज गाठ मारु नका, नाहीतर माथापट्टी आपल्या माथ्यावर नीट बसणार नाही. ५. आता एखाद्या नेकल्सप्रमाणे माथापट्टी आधी गळ्यात घालून घ्या. त्यानंतर आपण केसांना ज्या पद्धतीने हेअर बँड लावतो, त्याच पद्धतीने गळ्यांतील माथापट्टी हलकेच डोक्यावर बसवून घ्या.
असे केल्याने आपली माथापट्टी व्यवस्थित डोक्यावर आपल्याला हवी तशी फिट बसेल. माथापट्टी डोक्यावर फिट बसावी म्हणून त्याला दोन्ही बाजुंनी बरेच पीन लावून सेट करण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा ठरेल. यामुळे वारंवार पीन लूज झाली म्हणून माथापट्टी फिट बसली नाही, बरेच पीन लावल्याने केसांचा गुंता झाला, यांसारख्या समस्यांपासून दूर राहता येईल. तसेच माथापट्टी व्यवस्थित डोक्यावर फिट बसल्याने आपले सौंदर्य अधिकच खुलून येण्यास मदत होईल.