श्रुती भुतडा.
तुमचे कपडेच तुम्हाला तुमच्या आरोग्याचे अपडेट्स देतील, तुम्हाला संसर्गापासून वाचवतील, सभोवतालची माहितीही क्षणात उपलब्ध करुन देतील, असं सांगितलं तर त्यावर आपला चटकन विश्वास बसणार नाही. मात्र, कधीकाळी शरीर झाकण्यासाठी गरज म्हणून वापरले जाणारे कपड्यांनी पुढे फॅशन म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे कपडेही स्मार्ट झालेत. ९ जलै अर्थात जागतिक फॅशन डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त माणसाच्या जगण्याचा भाग बनलेल्या या फॅशनच्या प्रवासाचा घेतलेला हा वेध.(Your clothes will give health update, prevent infection! A new smart revolution in the world of fashion).
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापूर्वीपर्यंत कपड्यांचा वापर हा केवळ गरजेपुरता मर्यादित होता. मात्र, युद्धादरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट्स, अधिक खिसे असलेले कोट-शर्ट तयार झाले आणि येथूनच खऱ्या अर्थाने कपड्यांच्या वैविध्यपूर्ण निर्मितीला सुरुवात झाली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे युद्धापूर्वी महिला केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरताच मर्यादित होत्या. युद्धात मोठ्या प्रमाणात पुरुषांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिवाराची सर्वच जबाबदारी महिलांवर आली. युद्धकालीन परिस्थिती, स्वसंरक्षण, ओळख लपविण्याची गरज आणि आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे महिलांनी घरातील कर्त्या पुरुषांचे कपडे वापरायला सुरुवात केली. हे कपडे स्कर्ट, गाऊन यापेक्षा अधिक सुरक्षित आणि वापरायला आरामदायी असल्याने युद्ध संपल्यानंतरही याच धर्तीवर तयार करण्यात आलेल्या कपड्यांची फॅशन आली. या कपड्यांत अधिक रुबाबदार आणि आत्मविश्वास असल्याची अनुभूती महिलांना आली. त्यामुळे यात वैविध्यपूर्ण डिझायनर ट्रेण्डही आले.पॅरिसमधून खऱ्या अर्थाने फॅशनची सुरुवात झाली. जगभरासाठी पॅरीस म्हणजे फॅशन डेस्टिनेशन बनलं. आजही पॅरीसने फॅशन क्षेत्रातलं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. फरक एवढाच की, फॅब्रिकला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आता जगभरात संशोधन सुरू आहे. काही ठिकाणी लिथिअम बॅटरीयुक्त कोटची निर्मिती सुरू आहे. हा परिधान केल्यानंतर तो शरीराचे तापमान नियमित करतो. या कपड्यातच उष्णतेचे संवेदक (टेम्परेचर सेन्सर्स) शिवण्यात आले आहेत. हा कोट अत्यंत कमी वजनाचा व आरामदायी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन अशाप्रकारे वेअरेबल फॅशनचा नवा ट्रेण्ड आपल्यासमोर येणार आहे.
पहिल्या महायुद्धापूर्वी फ्रान्स हे फॅशनचे केंद्र होते. अमेरिकन महिलांनी दिशा आणि मार्गदर्शनासाठी फ्रेंच डिझायनर्सकडे पाहिले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांच्या फॅशनमध्ये फारशी सुबत्ता नव्हती. स्त्रियांची फॅशन हळूहळू कमी मर्यादित आणि कृत्रिम बनत असताना, पुरुषांची फॅशन आधीच आरामदायक व उत्कृष्ट होती. पुरुषांसाठी, सूट हा दिवसाचा गणवेश होता. पहिल्या महायुद्धात शिपिंग नाकेबंदीदरम्यान फ्रान्सकडे जगाची तात्पुरती फॅशन कॅपिटल म्हणून पाहिले गेले. त्यानंतरच्या काळातील सामाजिक बदलांमुळे स्त्रियांसाठी लहान स्कर्ट प्रथमच सादर झाले. दुसऱ्या महायुद्धाचा मात्र अमेरिकन फॅशनवर अधिक प्रभाव पडला. स्त्रियांनी स्लॅक्स घालणे सर्वमान्य झाले. त्यानंतर मात्र फॅशनचं जग अधिक विस्तारत गेले. त्या-त्या देशांतील राजसत्ता, आक्रमणे यांनुसार फॅशन बदलत गेली आणि आता एकविसाव्या शतकात फॅशनने गरीब-श्रीमंती हा भेदच दूर केला. तंत्रज्ञानाने परिपूर्ण भविष्यातील फॅशन माणसाचं जगणं अधिक समृद्ध करेल, यात शंकाच नाही.
कपड्यांमध्येही नॅनो टेक्नोलॉजी...
नॅनो टेक्नोलॉजीचा वापर अलिकडे सर्वच क्षेत्रांमध्ये होतो आहे. कपड्यांमध्येही याचा वापर सुरू झाल्याने रिंकल फ्री, धुळीतही दीर्घकाळ स्वच्छ आणि विनादुर्गंध राहणाऱ्या कपड्यांची निर्मिती शक्य झाली आहे. याशिवाय डासांना पळवून लावणारे व विषाणुसंक्रमणापासून आपल्याला दूर ठेवण्याची क्षमता असलेले कपडेही लवकरच प्रचलित होण्याच्या मार्गावर आहेत. इथपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे हे सर्व करताना कपड्याचा पोत, रंग आणि त्याच्या दिसण्यात जराही बदल होत नाही.
स्मार्ट फॅब्रिक टेक्नोलॉजीचे युग...
कापडाच्या निर्मितीप्रसंगी धाग्यांसोबत विद्युतवाहक माध्यमांचा समावेश करण्याचे तंत्रज्ञान अलिकडे वापरले जाते आहे. त्यामुळे वाहनक्षेत्र अथवा वैद्यकीय क्षेत्र अशा कोणत्याही क्षेत्रात अशा कापडाच्या वापरामुळे वायर्सला प्रभावी पर्याय निर्माण होणार आहे. भविष्यात डॅशबोर्डवरील कपडाच डिस्प्लेचं काम करू शकेल. बुटांमध्येही असं फॅब्रिक वापरलं जातंय. जेणेकरुन तुमच्या रोजच्या वर्कआऊटचा संपूर्ण डेटा तुमचे शूज स्वतःच तुम्हाला उपलब्ध करुन देतील.
पुन्हा पर्यावरणपूरक फॅशनकडे...
उत्क्रांतीनंतर मात्र गरजांच्या क्रमाने संशोधन वाढत गेले आणि कृत्रिम फॅब्रिकच्या निर्मिती आणि वापराला पसंती दिली गेली. यासोबत खादी असली तरीही त्याचा वापर हा अत्यंत कमी होत आला आहे. अनेक कपड्यांचे प्लास्टिकप्रमाणे लवकर विघटन होत नसल्याने टाकावू कपड्यांच्या विघटनाचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्यामुळेच आता नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कापडनिर्मितीचा ट्रेण्ड आला आहे.
(लेखिका नाशिकस्थित सॅवी स्कुल ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या संचालक आणि फॅशन कन्स्लटंट आहेत.)