घरात बाळ येणार म्हटलं की आई-वडिलांची आणि घरातील इतर मंडळींचीही जोरदार तयारी सुरु होते. सगळं घरच आनंदानं बागडत असतं. मग होणाऱ्या आईचे लाड सुरु होतात आणि सगळेच बाळाची आतुरतेने वाट पाहायला लागतात. बाळाचे आगमन हा मुद्दा जितका वैयक्तिक, भावनिक असतो तितकाच तो आर्थिक बाबींशीही जोडलेला असतो. आपलं मूल, आपला अंश या जगात येणार म्हणून आनंद असला तरी त्याचा खर्च आपण कसा भागवणार याबाबत आपल्याला चिंता वाटायला लागते. बाळाचे कपडे, त्याच्या खाण्यापिण्याबाबतचा विचार, त्याची खेळणी या सगळ्याचा विचार होत असतानाच त्याचे भविष्य सुखी व्हावे यासाठी आर्थिक गोष्टींचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही आई व्हायचा निर्णय घेत असाल तर खालील गोष्टींचा आवर्जून विचार करा...
१. खर्चाचा अंदाज लावा - साधारणपणे बाळ होणार म्हटल्यावर नोकरी करणाऱ्या स्त्रिया बाळाचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण व्हावे, त्याच्याकडे लक्ष देता यावे म्हणून नोकरी सोडण्याचा किंवा काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतात. तेव्हा नवीन बाळ येणार म्हटल्यावर तुमच्या घरात येणारे पैसे कमी होऊन खर्च मात्र वाढणार आहे हे लक्षात घ्या. तेव्हा डिलिव्हरीच्या खर्चापासून पुढच्या प्रत्येक गोष्टीचे योग्य पद्धतीने प्लॅनिंग करा. येणाऱ्या काळात आपण आहे त्या इनकममधून बाळासाठी कशापद्धतीने सेव्हींग करणार आहोत याचा जोडीदारांपैकी दोघांनी चांगला प्लॅन बनवा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक ओढाताण होणार नाही.
२. नोकरी सोडायच्या आधीच बचत करा - बाळाचा जन्म झाल्यावर कुटुंबातील अडचणींमुळे आपल्याला नोकरी सोडावी लागणे साहजिक असू शकते. मात्र आपण जेव्हा बाळाचे प्लॅनिंग करणार आहात त्याच्या आधी एक वर्षापासून तुम्ही योग्य पद्धतीने बचत करु शकता. यासाठी तुम्हाला पुरेसे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे बाळाचे कपडे, तुमचे खर्च, बाळाची औषधे असे किमान खर्च या बचतीतून नक्की निघू शकतात.
३. आरोग्य विमा पॉलिसीबाबत - सध्या आपल्या नोकरीच्या ठिकाणी आरोग्य विमा पॉलिसी असते. आपण नोकरी सोडणार असू तर जोडीदाराच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या विमा पॉलिसीमध्ये थोडे जास्त पैसे भरुन कुटुंबाला कव्हर मिळेल असे पाहावे. जेणेकरुन बाळाला कोणते वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ आली तर आपल्यावर त्याचा ताण येणार नाही. याबाबत वेळीच योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही केल्यास आर्थिक ओढाताण होणार नाही.
४. शिक्षणासाठी आर्थिक नियोजन - आता बालवाडीत प्रवेश घेतानाच लाखो रुपयांची फी असते. तसेच अनेक वेळा डोनेशनही भरावे लागते. त्यामुळे मूल ३ वर्षाचे झाल्यापासून त्याच्या शिक्षणाचा आणि शिक्षणाशी संबंधित इतर गोष्टींचा मोठा खर्च सुरु होतो. त्यामुळे दरवर्षाला येणाऱ्या शैक्षणिक खर्चाचा अंदाज घ्या आणि त्यानुसार शेअर गुंतवणूक, म्युच्युअल फंड किंवा फिक्स डिपॉझिट, रिकरींग यांसारख्या सुविधा करुन ठेवा. मूल १५ वर्षाचे होईल तेव्हा त्याला उपयोगी येईल अशी एखादी गुंतवणूक करा. जेणेकरुन त्याच्या १० वी नंतर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला एक चांगली रक्कम हाताशी राहील.