पाठदुखी ही सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्रास देणारी समस्या आहे. दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसल्याने आपली पाठ अवघडते. नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून- आवरुन आपण जे कामाला सुरुवात करतो ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. महिलांच्या बाबतीत तर सकाळी उठल्यापासून ओट्यासमोर स्वयंपाकाची कामे, ऑफीसला जाण्यासाठी गाडीवर किंवा इतर कोणत्या वाहनाने प्रवास यांमुळे सतत बैठ्या नाहीतर उभ्या स्थितीत राहावे लागते (2 Easy Exercises for Back Pain).
कित्येकदा आपण पाठ न टेकवता किंवा अवघडल्यासारखे बसतो, कामाच्या नादात आपल्या हे लक्षातही येत नाही. पण जसा दिवस संपायला लागतो तशी आपल्याला पाठीला रग लागल्याचे लक्षात येते बसण्याची चुकीची पद्धत, खूप जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, व्यायामाचा अभाव यांमुळे पाठदुखीची समस्या उद्भवते. सुरुवातीला ही पाठदुखी कमी प्रमाणात असली तरी हळूहळू हे दुखणे वाढत जाते आणि त्याचा ताण आपला मणका, खांदे, हात, मांड्या, पाय यांच्यावर यायला लागतो.
हळूहळू ही पाठदुखी इतकी वाढते की आपल्याला काहीच सुधरत नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. अशावेळी पाठदुखी कमी करण्यासाठी अगदी ५ मिनीटांत होतील असे व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी हे व्यायाम करुन दाखवले आहेत.
१. दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहा. कंबरेतून खाली वाकून एक हात जमिनीला टेकवा आणि दुसरा हात सरळ रेषेत वर घ्या. वर घेतलेल्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजुने करा. म्हणजे कंबरेला आणि मणक्याला चांगला व्यायाम होईल.
२. गुडघे आणि हाताचे तळवे जमिनीटवर टेकवून प्राण्यांसारखे बसा. पुन्हा एक हात टेकवून दुसरा हात वर करा आणि वरच्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. यामुळे मानेपासून कंबरेच्या खालच्या भागापर्यंत सगळ्या भागाला अतिशय चांगला व्यायाम होतो. बसून बसून अवघडले असेल तर स्नायू मोकळे होण्यासही या व्यायामाची चांगली मदत होते.