आपल्याला माहिती आहे की अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. तिचा पायाला फ्रॅक्चर झाले असून, सध्या ती व्हिलचेअरवरच आहे. पण तरीही तिने व्यायाम करणं सोडलेलं नाही. तिने नुकतीच जी पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे, त्यात ती म्हणतेय की कोणतीही समस्या ही समस्या नसतेच. आपला त्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, त्यावर ते अवलंबून असते. असं म्हणत शिल्पाने स्ट्रेचिंगचे २ प्रकार सांगितले आहेत. हे प्रकार खूप सोपे आहेत. खुर्चीवर बसल्या बसल्याही तुम्हाला ते करता येतील. त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत.
पहिला व्यायाम१. ताडासन (Swaying Palm Tree Pose)हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. हातांची बोटे एकमेकांत अडकवून हात सरळ वर करा. दोन्ही पायाच्या टाचा उचला आणि पंजावर जोर द्या. हात आणि पाय शक्य तेवढे ताणून ठेवण्याचा प्रयत्न करा.
२. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कंबर, पाठ, पाठीचा कणा येथील स्नायूंची लवचिकता वाढण्यास मदत होते. पोटावर ताण येऊन पोट कमी होण्यासही मदत होते. cervical pain होत असल्यास हा व्यायाम करू नये.
दुसरा व्यायामगोमुखासन (Cow Face Pose)१. गोमुखासन करण्यासाठी जमिनीवर बसा. सुरुवातीला उजवा पाय वर, डावा पाय खाली अशापद्धतीने मांडी घाला. हळूहळू दोन्ही गुडघे एकमेकांवर येतील अशा पद्धतीने पाय जवळ आणा. उजवा हात वर उचलून त्याचा तळवा पाठीवर ठेवा. डावा हात खालच्या बाजूने घेत पाठीवर न्या. आणि दोन्ही तळहात एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने डावा पाय आणि डावा हात वर घेऊन व्यायाम करा.
२. यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते. खांदे आणि छातीचे स्नायू लवचिक होतात. फुफ्फुसांसाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो. फ्रोजन शोल्डचा त्रास होत असल्यास तज्ज्ञांच्या मदतीने हा व्यायाम करावा.