दिवाळी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. दिव्यांचा या सणाला सगळीकडे आनंद आणि प्रकाश पसरण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. यासाठी आपलं मन आणि डोकं फ्रेश असणं गरजेचं असतं. दिवाळीच्या निमित्ताने आपण साफसफाई, फराळ, खरेदी असं सगळंच काही ना काही करत असतो. त्यामुळे आपल्याला थकवा यायची शक्यता असते. इतकंच नाही तर अनेकदा बरीच कामं करुन अंगदुखी होण्याचीही शक्यता असते. अशावेळी काही सोपी आसनं केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. तेव्हा यंदाच्या दिवाळीला मनानी आणि शरीराने फ्रेश व्हायचं असेल तर ही आसनं नियमित करा ( 3 Best Yoga Poses for Good Mental Health in Diwali).
१. बालासन
बालासन हे करायला अतिशय सोपे आणि उपयुक्त असे आसन आहे. यामुळे शरीराच्या वरच्या भागावर आलेला ताण कमी होण्यास मदत होते. तसेच या आसनाने पाठीचे स्नायूही मोकळे होण्यास मदत होते. बालासनामुळे शरीर रीलॅक्स होऊन मनही शांत होण्यास मदत होते. तसेच स्नायूंवर आलेला ताण कमी होऊन शरीराची ठेवण सुधारण्यास बालासनाचा चांगला उपयोग होतो. हे आसन नियमितपणे केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. करायला अतिशय सोपे असलेले हे आसन झोपेतून उठल्यावर, झोपण्याच्या वेळी किंवा रिलॅक्स व्हायचे असेल तर केव्हाही केलेले चालते.
२. शवासन
शवासन हे सर्वात सोपे आणि अनेकांना आवडणारे आसन आहे. आपण दिवसभर नुसते धावत राहतो. पण स्वत:साठी शांत वेळ देणे आपल्याला अनेकदा शक्य होत नाही. थोडा जरी वेळ मिळाला तरी आपण लगेच सोशल मीडियावर स्क्रोलिंग करतो. मात्र आपल्या आत डोकावून पाहणे, मन शांत करणे याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण शरीर आणि मनाला रिलॅक्स करायचे असेल तर स्वत:च्या आत डोकावून पाहणे, स्वत:ला थोडा वेळ देणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे नियमितपणे शवासन करावे.
३. हलासन
हलासन हे असे एक आसन आहे ज्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराला आणि पाठीच्या मणक्याला स्ट्रेच मिळतो. तसेच या आसनामुळे ताण, भिती कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचा भार खांद्यांवर आणि डोक्यावर पेलवत असल्याने या आसनामुळे एकप्रकारे संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश वाटावे असे वाटत असेल तर नियमितपणे हलासन करावे.