आपण थोडं काम केलं तरी दमतो. दिवसभर बैठं काम असल्यानं तर आपले सगळे स्नायू ठणकत असतात. व्यायाम हा यावर एकमेव उपाय असल्याचे आपल्याला माहित असते. पण इतर गोष्टींच्या नादात आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पावसाळ्याच्या वातावरणात तर एकीकडे दमट हवामान आणि दुसरीकडे पावसामुळे गारवा अशात हाडं किंवा स्नायू जास्त ठणकतात. शरीराची ताकद वाढवायची असेल तर व्यायामाला पर्याय नाही. दिवसात तासभर व्यायामासाठी वेळ नसेल तरी ठिक आहे. सकाळी फक्त १५ मिनीटांत तुम्ही काही सोपे व्यायामप्रकार केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो (Fitness Tips). दिवसभर कामासाठी एनर्जी टिकून राहावी असं वाटत असेल आणि आपल्या शरीराची ताकद वाढवायची असेल तर पाहूयात घरातल्या घरात झटपट करता येतील असे ३ व्यायामप्रकार आणि त्याचे फायदे (3 easy 15 mins Exercises for body Strengthening)...
१. बेडूक उड्या (Frog Jumps)
बेडूक उड्या हा पारंपरिक पण अतिशय उपयुक्त असा व्यायामप्रकार आहे. मजा म्हणून आपण सगळेच लहानपणी बेडूक उड्या मारलेल्या असतात. पण याच उड्या व्यायाम म्हणून उत्तम असतात असे आपल्य़ाला कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असून आपण आपल्या शरीराचा भार स्वत:वर घेत असल्याने स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन हात एकमेकांत अडकवायचे. त्यानंतर पुढे उडी मारताना खाली बसायचे आणि पुन्हा वर उठायचे. पुन्हा पुढे उ़डी मारत गुडघ्यातून खाली बसायचे. असे किमान १० ते १५ वेळा केल्यास पाठ, कंबर, पाय असा संपूर्ण शरीराचाच व्यायाम होतो.
२. बर्पी (Burpees)
झटपट आणि सर्वांगाचा व्यायाम करायचा असेल तर हा उत्तम व्यायामप्रकार आहे. यामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होत असल्याने अगदी ५ ते ७ मिनीटांत होणारा हा व्यायामप्रकार आपण सहज करु शकतो. प्लॅंकच्या पोझिशनमध्ये शरीर सरळ रेषेत राहीत असे उभे राहायचे. हात पुढे जमिनीवर टेकवून पाय उडी मारत मागे घ्यायचे. एक पुश अप मारायची. परत पाय हाताजवळ घेऊन उभे राहायचे. यामध्ये हाताची ताकद वाढते, कोअरची ताकद वाढते आणि पायाचाही व्यायाम होतो. सुरुवातीला हे कमी वेगाने केले तरी चालते पण हळूहळू वेग आणि संख्या वाढवल्यास त्याचा फायदा होतो.
३. पुश अप (Push Up’s)
कधीही, कुठेही करता येणारा हा व्यायाम अतिशय सोपा आणि तरीही खूप उपयुक्त म्हणून ओळखला जातो. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पुशअप्स हा उत्तम व्यायामप्रकार आहे. दोन्ही हाताचे तळवे आणि पायाची बोटे यांवर शरीराचा सगळा भार देऊन उभे राहावे. हात कोपरात वाकवून शरीर खाली न्यायचा प्रयत्न करावा. हे करताना कंबर सरळ एका रेषेत जमिनीला समांतर असेल अशी काळजी घ्यायची. हा व्यायाम करताना कोपर शरीराच्या जास्तीत जास्त जवळ राहील असा प्रयत्न करावा. हा व्यायाम झटपट होत असल्याने तुम्हाला शक्य आहेत तितकी रिपिटेशन्स केल्यास स्नायूंना बळकटी मिळण्यास याचा चांगला फायदा होतो.