Join us  

पाठ प्रचंड दुखायला लागल्यानै हैराण होता? करा ५ मिनिटांत होणारे ३ उपाय, कमी होईल त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 4:14 PM

3 Easy Exercises For Back Pain : नियमित ५ मिनीटे स्वत:साठी दिल्यास दुखणं वेळीच आटोक्यात येऊ शकतं.

पाठदुखी ही अनेकांसाठी अतिशय सामान्य समस्या आहे. महिला वर्गात तर सतत ओट्यापुढे उभे राहून किंवा वाकून कामं करुन पाठदुखीची समस्या उद्भवते. दिवसभर ऑफीसमध्ये असणारे बैठे काम, बसण्याची पद्धत, प्रवास यांमुळेही अनेकांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो. त्यातही घर, ऑफीस असं सगळं करता करता आपल्याला नियमितपणे व्यायामाला वेळ होतोच असं नाही. मात्र एकदा पाठ दुखायला लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही. नीट बसताही येत नाही आणि अनेक हालचालींवर बंधनं येतात (3 Easy Exercises For Back Pain). 

मग डॉक्टरांकडे गेल्यावर कधी स्लीप डीस्क तर कधी डीस्क दबली गेल्याचे समजते आणि मग औषधोपचार, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन यांसारखे उपचार घ्यावे लागतात. पण इतकी वेळ येऊ नये आणि पाठदुखीसारखी सामान्य वाटणारी पण सतत छळणारी समस्या दूर व्हावी यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आज आपण अगदी झटपट होणारे आणि पाठीचा मणका, कंबर, खांदे यांच्या दुखण्यापासून आराम देणारे ३ सोपे व्यायामप्रकार पाहणार आहोत. नियमितपणे हे व्यायाम केल्यास आपल्याला पाठदुखीपासून निश्चितच आराम मिळू शकतो. प्रसिद्ध योग अभ्यासक काम्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून याबाबतची माहिती देतात. 

(Image : Google)

बालासन

बालासन करण्यासाठी वज्रासनात बसावं. कमरेतून समोर झुकावं. डोकं जमिनीला टेकवावं. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून समोर लांब/ सरळ ठेवावेत. छातीनं मांड्यांवर दाब द्यावा. हे आसन करताना मंद गतीनं श्वसन सुरु ठेवावं. बालासन केल्यानं पाठ आणि कंबरेच्या तक्रारी दूर होतात. पाठ, कंबर, खांद्यांमधील आखडलेपणा दूर होतो. मेंदू, मन शांत होऊन स्मरणशक्ती वाढण्यास याची चांगली मदत होते.

मार्जरासन

मार्जरासन करताना गुडघ्यावर बसावं.  पुढच्या दिशेने झुकून दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. खांदे आणि मांड्या ताठ ठेवाव्यात. दीर्घ श्वास घेत मान वर करुन आकाशाकडे पाहावं. मान उंच करताना पाठ जमिनीच्या दिशेने खाली न्यावी. श्वास सोडत मान जमिनीच्या दिशेनं खाली करावी आणि पाठ वर उचलावी. हे असं किमान दहा वेळा करावं. 

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन म्हणजे दोन्ही पाय पोटावर घेऊन ते दाबतो. त्यामुळे पोटातील गॅसेस बाहेर येण्यास मदत होते. इतकेच नाही तर पाठीच्या मणक्याला यामुळे आराम मिळण्यास मदत होते. यामध्ये डावीकडे आणि उजवीकडे वळायचे, त्यामुळे पाठ जमिनीवर घासली जाते आणि पाठीला चांगला मसाज होतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामपाठीचे दुखणे उपाय