ऑफीसमध्ये नोकरी करणारे बहुतांश जण दिवसाचे ९ ते १० तास एका जागी बसून असतात. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना चांगली खुर्ची घेतली, टेबल चांगले असले तरी आपली बसण्याची पद्धत योग्य नसल्याने काही वेळाने आपली पाठ दुखायला लागते. कधी आपण खूप पुढे वाकून बसतो तर कधी बराच काळ पाठीत वाकलेले राहतो. सुरुवातीला आपल्याला हे लक्षात येत नाही, पण जसजसे दिवस जातात तशी आपल्याला आपल्या शरीराची ठेवण चुकल्याची आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याची जाणीव व्हायला लागते. मग कमी वयातच पाठीचं दुखणं मागे लागतं आणि मान- पाठ, खांदे आखडून जातात. एकदा पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही (3 Easy Exercises to Reduce Back Pain).
कधी कधी कंबरदुखी इतकी सतावते की काहीच सुधरत नाही. अशावेळी नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही. रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ मिळत नाही ही अनेकांची तक्रार असते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवलेली ही समस्या दूर करण्यासाठी औषध-गोळ्या घेण्यापेक्षा जाता येता काही सोपे व्यायाम करणे हा केव्हाही उत्तम उपाय असतो. पाठ, कंबर, मणका हे आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपण कितीही धावपळीत असू तरी थोडा वेळ काढून आपल्या कंबरेच्या, पाठीच्या दुखण्यावर उपयुक्त असे व्यायामप्रकार आवर्जून करायला हवेत. प्रसिद्ध योगतज्ज्ञ मानसी गुलाटी काही व्यायामप्रकार सांगतात, जे नियमित केल्याने पाठीला आराम मिळू शकतो.
१. हॅमस्ट्रींग स्ट्रेच
पाठीवर झोपून डावा पाय गुडघ्यात वाकवा. उजवा पाय सरळ उचलून दोन्ही हाताने या पायाला गुडघ्यापाशी आधार द्या. हे करताना डोकं, पाठ, खांदे जमिनीला नीट टेकलेले राहतील याची काळजी घ्या. वर घेतलेला पाय जास्तीत जास्त आपल्या बाजुने खेचला तर पाठीला चांगला ताण पडतो. हा व्यायाम १० ते २० सेकंदांसाठी करा.
२. पवनमुक्तासन
पाठीच्या कण्याला ताण पडावा यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पाठीवर झोपून दोन्ही पाय काटकोनात सरळ करावेत. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून गुडघे जास्तीत जास्त पोटाकडे ओढून घ्यावेत. यामुळे पोटाला तर ताण पडतोच पण मणक्यालाही ताण पडतो.
३. स्पायनल स्ट्रेच
पाठीचा कणा हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग असून त्याला ताण आला की आपल्या पूर्ण हालचालींवर बंधने येतात. कोणत्याही अवयवासाठी स्ट्रेचिंग हा उत्तम व्यायामप्रकार असून त्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपताना ऑफीसमधून घरी आल्यावर काही किमान स्ट्रेचिंग केल्यास शरीराला आलेला ताण कमी होण्यास मदत होते. वज्रासनात बसून डोके खाली टेकवायचे आणि दोन्ही हात समोरच्या बाजुने ताणायचे. यामुळे कण्याला आणि पाठीच्या इतर स्नायूंनाही चांगलाच ताण पडतो आणि आराम मिळण्यास मदत होते.