Join us  

तुमच्या घोरण्यामुळे इतरांची रोज झोपमोड होते? ५ मिनीटांत करा ३ व्यायाम, घोरणे होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 2:48 PM

3 Effective Yoga For Snoring Issue : घरात घोरणाऱ्या व्यक्तींना ही आसने नियमितपणे करायला सांगितली तर त्याचा निश्चितच फायदा होतो.

घोरणे ही आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे त्रासदायक समस्या आहे, त्याचप्रमाणे ती इतरांसाठीही तितकीच त्रासदायक गोष्ट आहे. गाढ झोपलो की आपण आपल्याही नकळत घोरतो आणि त्याचा आपल्यापेक्षा इतरांना सगळ्यात जास्त त्रास होतो. दुसऱ्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे आपल्याला अजिबात झोप येत नाही. श्वसनक्रियेत अडथळा निर्माण झाल्याने व्यक्ती झोपेत घोरतो. घोरणं हे गाढ झोप लागल्याचं एक लक्षण असलं तरी ते प्रमाणाबाहेर असेल तर मात्र त्रासदायक होतं. वजन जास्त असणे, श्वसनाचे विकार, व्यसन, झोपण्याची स्थिती अशी घोरण्यामागे बरीच कारणे असतात (3 Effective Yoga For Snoring Issue). 

घोरण्याच्या समस्येसाठी काही उपाय असतात, योगासने हा त्यातीलच एक उपाय आहे. काही ठराविक योगासनांनी हे घोरणे आटोक्यात येऊ शकते. सर्व योगा स्टुडिओचे प्रमुख सर्वेश शशी यांनी घोरणे कमी होण्यासाठी काही आसने सांगितली आहेत. ती कोणती आणि कशी करायची याविषयी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या घरात घोरणाऱ्या व्यक्तींना ही आसने नियमितपणे करायला सांगितली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. 

(Image : Google)

१. धनुरासन

 धनुरासन करण्यासाठी जमिनीवर पालथं झोपावं. गुडघे वाकवून ते कमरेजवळ आणावेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडावेत. नंतर डोकं, छाती आणि जांघ हे वरच्या दिशेने ताणावे. शरीराचा संपूर्ण भार पोटाच्या खालच्या भागावर घ्यावा. शरीराल पुढच्या दिशेनें खेचण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत किमान १५ ते २० सेकंद राहावं. श्वास हळुहळु सोडत छाती आणि पाय जमिनीवर टेकवावेत. हे आसन अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त पाच वेळा करावं.

२. भुजंगासन

जमिनीवर पोटावर झोपावे, हात कंबरेपाशी टेकवून ठेवावेत. बेंबीपासूनचा भाग वर उचलून कंबरेतून मागे वाकावे. यावेळी पाय, गुडघे, हाताचे पंजे जमिनीला टेकलेले ठेवावेत. पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. ताण कमी करण्यासाठी, पाळी नियमित होण्यासाठी आणि श्वसनाच्या समस्या दूर होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. 

३. भ्रामरी प्राणायम 

भ्रामर म्हणजे भुंगा. जिभ टाळूला चिकटवून ठेवून भुंग्यासारखा आवाज काढणे म्हणजे भ्रामरी प्राणायम. हे प्राणायम केल्यास श्वसनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे घोरण्याची समस्या कमी व्हावी यासाठी नियमितपणे भ्रामरी प्राणायम करायला हवे. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेलाइफस्टाइलहेल्थ टिप्स