नवीन वर्ष आलं की आपण काही ना काही संकल्प आवर्जून करतो. सुरुवातीला काही दिवस हे संकल्प पाळले जातात. पण नंतर मात्र ते हवेत विरुन जातात. काही वेळा आपण व्यावहारीकदृष्ट्या विचार न करता भावनेच्या भरात संकल्प करतो आणि ते व्यवहारात बसणारे नसल्याने मागे पडतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यासाठीच खास टिप्स शेअर करतात. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री करीना कपूरच्या डायटीशियन म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आहाराच्या बाबतीत लोकल तेच उत्तम हा मंत्र सांगताना आपली आजी, आई जे खायची ते कसे योग्य असते असे त्या कायम सांगतात (3 Health Resolutions to Avoid in 2023).
सोशल मीडियावरही त्या आपल्या फॉलोअर्सना कायम काही ना काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये फिटनेससाठी संकल्प करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी त्या सांगतात. अवाजवी संकल्प न करता झेपेल, प्रत्यक्षात उतरेल असेच संकल्प करायला हवेत. २०२३ मध्ये आहार किंवा फिटनेसबाबतचा संकल्प करत असाल तर ३ गोष्टी आवर्जून टाळा याबाबत इन्स्टाग्रामवर नव्याने केलेल्या पोस्टबाबत ऋजूता सांगतात.
१. मी नव्या वर्षात अजिबात गोड, भात किंवा डेअरी उत्पादने खाणार नाही असे अनेक जण ठरवतात. मात्र एकतर खूप खायचे नाहीतर अजिबात नाही, अशी दोन टोकं नकोत. असे करण्यापेक्षा घरात तयार केलेले पदार्थ योग्य प्रमाणात खायला हरकत नाही.
२. नवीव वर्षात बहुतांश लोक व्यायाम करायचा संकल्प करतात. मात्र हा संकल्प काही दिवस नाहीतर काही आठवडे टिकतो. पण नंतर दररोज व्यायामाला वेळ काढणे जमत नाही किंवा कंटाळा केला जातो. त्यापेक्षा सुरुवातीला आठवड्यातील ३ दिवस व्यायाम करणार असे ध्येय ठेवा आणि मग हळूहळू दिवस आणि वेळ वाढवत न्या. त्यामुळे संकल्प हा संकल्पच न राहता तो प्रत्यक्ष फॉलो केला जाईल.
३. मी या वर्षात १० किलो किंवा २०, ३० किलो वजन कमी करणार असा संकल्प बरेच जण करतात. मात्र केवळ आकडे महत्त्वाचे नाहीत तर वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी नियमितपणे योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. त्यामुळे लहान टार्गेट ठेवून त्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न करा.