आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. पण सकाळच खराब झाली तर मात्र संपूर्ण दिवसावर त्याचा परीणाम होतो. गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. येणारं वर्ष आणि प्रत्येक दिवस छान आनंदी जावा यासाठी आपण काही ना काही संकल्प जरुर करत असतो. वसंतु ऋतुचे आगमन होत असताना वातावरणातही अनेक नवीन बदल होत असतात. या पार्श्वभूमीवर आपला येणारा प्रत्येक दिवस आनंददायी असावा यासाठी आपण काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं (3 Healthy Habits to practice at the start of the Day).
आपली स्वप्न, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धावत असतानाच आजुबाजूला असलेल्या ताणाशी, स्पर्धेशी जुळवून घेताना रोजचा दिवस चांगला व्हावा असे आपल्याला वाटते. पण यासाठी अगदी छोट्या आणि सहज करता येतील अशा गोष्टींपासून सुरुवात करता यायला हवी. आहारतज्ज्ञ श्वेता शाह-पांचाळ यांनी यासाठीच रोज सकाळी उठल्यावर काय केल्यास आपल्याला फ्रेश वाटेल याविषयी अगदी सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत त्या कोणत्या पाहूया...
१. मोबाइलला हात लावू नका
अनेकांना रात्री डोळे मिटेपर्यंत आणि सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मोबाइल पाहण्याची सवय असते. आपण त्यावर अगदी वेळ घालवत नसलो तरी किमान वेळ पाहायला तरी आपण मोबाइल हातात घेतो. सकाळी उठल्यावर मेलाटोनिन या हार्मोनची निर्मिती झालेली असते. आपण फोन हातात घेतला तर यामध्ये अडथळा येतो आणि आपला रीदम चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे उठल्या उठल्या मोबाइल अजिबात हातात घेऊ नये. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊन तुम्ही इरीटेट व्हाल, आळस वाटेल.
२. उठल्या उठल्या आवर्जून खा या गोष्टी
झोपेतून उठल्यावर अनेकांना चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असते. मात्र हे आरोग्यासाठी घातक असून त्याऐवजी ताजी फळं, सुकामेवा यांसारख्या गोष्टी खाव्यात. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतोच असे नाही पण पोटाचे आरोग्य आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे दिवसभर इन्शुलिन लेव्हल चांगली राहण्यास मदत होते. दिवसभर सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ती यामुळे होत नाही.
३. तेलाने गुळण्या करणे
ही पद्धत तुम्हाला काहीशी वेगळी वाटू शकते. पण उत्तम आरोग्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त असते. यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्याबरोबरच त्वचेचे चांगले मॉईश्चरायजिंग होण्यासही याची चांगली मदत होते. हार्मोन्सचा बॅलन्स होण्यासाठीही ही पद्धत अतिशय फायदेशीर असते. यासाठी खोबरेल तेल वापरणे उपयुक्त ठरते.