वाढतं वजन असो किंवा मग शरीराचे इतर काही त्रास.. सगळ्यांच्या मुळाशी आहे चयापचय क्रिया. म्हणजेच शरीराचं मेटाबॉलिझम.. ते परफेक्ट असेल, तर मग बाकी सगळंही परफेक्टच असणार. बऱ्याचदा आरोग्याच्या बाबतीत बोलताना आपण काय खावं किंवा काय खाऊ नये, याविषयी चर्चा करतो. पण याच्या एवढंच महत्त्वाचं असतं आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन (digestion) होणं. नेमकं तेच जर झालं नाही, तर मात्र आरोग्यावर अनेक विपरित परिणाम व्हायला सुरुवात होते.
पचनक्रिया उत्तम असावी, यासाठी शरीराचं मेटाबॉलिझम (metabolism) म्हणजेच शरीरातील चयापचय क्रिया उत्तम असणं गरजेचं आहे. या क्रियेमध्ये खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होऊन त्यातून उर्जा निर्माण होते. ही उर्जा वेगवेगळ्या शारिरीक हालचाली करण्यासाठी तसेच शरीराच्या आतील भागांचे कार्य व्यवस्थित चालावे, यासाठी वापरली जाते. ॲनाबोलिझम आणि कॅटाबोलिझम हे दोन प्रकार मेटाबॉलिझम या प्रक्रियेत असतात. जर या प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या नाहीत, तर शरीरात निर्माण झालेल्या उर्जेचे व्यवस्थित वाटप होत नाही. यातूनच मग वजन वाढीसह अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच तर मेटाबाॅलिझम व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तेच नेमकं कसं साधायचं, खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी काय करायचं, हे सांगतेय मलायका अरोरा. (digestion tips by Malaika Arora)
पचनक्रिया, चयापयच सुधारण्यासाठी करा ३ आसनं१. त्रिकोणासन (Trikonasana किंवा Triangle pose)पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. हे आसन करण्यासाठी दोन्ही पायात योग्य अंतर ठेवून उभे रहा. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना करून वर उचला आणि खांद्याच्या समांतर ठेवा. आता उजवा तळपाय उजव्या दिशेने वळवा आणि संपूर्ण शरीर हळूहळू उजव्या दिशेने कंबरेतून खाली वाकविण्याचा प्रयत्न करा. उजवा तळहात उजव्या तळपायाशी ठेवण्याचा प्रयत्न करा. नजर समोरच्या दिशेला स्थिर करा. असे करताना डावा पाय मात्र सरळ हवा. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. असेच आसन दुसऱ्या बाजुनेही करावे.
२. मलासन (Malasana किंवा Garland pose)मलासन करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही पायात योग्य अंतर घ्या. दोन्ही हात छातीजवळ ठेवून नमस्काराच्या अवस्थेत एकमेकांना जोडा. हळूहळू खाली गुडघे दुमडून खाली वाका आणि खाली बसा. दोन्ही हातांचे कोपरे दोन्ही पायांच्या मध्ये असतील, अशी तुमची अवस्था ठेवा. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करावा.
३. गरुडासन (Garudasana किंवा Eagle pose)गरुडासन करण्यासाठी आधी दोन्ही पायांवर सरळ ताठ उभे रहा. यानंतर एक पाय दुसऱ्या पायाभोवती लपेटून घेण्याचा प्रयत्न करावा. एका पायावर शरीराचा तोल सावरावा. अशाच पद्धतीने हातदेखील एकमेकांभोवती गुंफावे. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसऱ्या पायाने आणि हातानेही अशीच आसनस्थिती करावी.