सानिया मिर्झा म्हणजे भारताची एक ग्लॅमरस खेळाडू. महिला खेळाडू, त्यांना मिळणारं ग्लॅमर याची व्याख्याच तिने बदलून टाकली आहे. त्यामुळेच तर एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे फॅन फॉलोईंग असणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून ओळखली जाते. मधल्या काही काळात स्वत:चं दुखणं, मुलाचा सांभाळ यात ती व्यस्त होतीच.. त्यामुळे तिचं तिच्या फिटनेसकडे थोडं दुर्लक्ष झालं.. पण आता पुन्हा एकदा ती तिचा फिटनेस अतिशय गांभिर्याने घेऊ लागली असून त्यासाठी तिने एकदम कंबर कसूनच व्यायामाला सुरुवात केली आहे.
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यासिर खान यांच्याकडे सानियाने जबरदस्त वर्कआऊट सुरु केलं आहे. व्यायामातलं तिचं सातत्य आणि झपाटलेपण पाहून यासिर तिच्यावर भलतेच खुश झाले आहेत. म्हणूनच त्यांनी सानियाचा एक वर्कआऊट व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. ती वेटलॉससाठी नेमका कोणता व्यायाम कशा पद्धतीने करते आहे आणि किती मेहनत घेते आहे, हेच तिच्या या व्हिडिओतून दिसून येतं. "Game, Set and Match" असं कॅप्शन यासिरने सानियाच्या व्हिडिओला दिलं असून पुढे ते म्हणत आहेत की सानियाने त्यांच्याकडे केवळ ६ वर्कआऊट सेशन केले आहेत, पण तरीही ती जवळपास ३ किलो वजन कमी करू शकली.
नेमका कोणता व्यायाम सानियाने?
फक्त ६ सेशन्समध्ये ३ किलो वजन कमी करणं ही खरोखरंच अवघड गोष्ट आहे. पण तरीही व्यायामातल्या सातत्यामुळे सानियाने हे जमवून आणलं. अर्थातच यासाठी तिला खूप कठीण व्यायाम करावा लागला. हे जमवून आणण्यासाठी यासिर यांनी तिच्यासाठी खास स्ट्रेन्थ, पॉवर, फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या गोष्टी असणारं वर्कआऊट पॅकेज डिझाईन केलं होतं. यामध्ये प्लँक्स, जीम बॉल, बॉक्स जंम्प्स, लेग रेजेस, वेट स्क्वॅट्स, पुशअप्स, वेट ट्रेनिंग अशा वेगवेगळ्या व्यायामांचा समावेश होता.
सानियाचं कौतूक करताना यासिर म्हणतात की ती जिममध्ये येते तेव्हाच तिने निर्धार केलेला असतो की बेस्ट मुव्हमेंट्स करून वर्कआऊटचा फडशा पाडायचा. आता सानियाचा व्यायाम पाहून तुम्हालाही झटपट वेटलॉस करण्यासाठी तिच्यासारखा व्यायाम करण्याची इच्छा होऊ शकते. पण असं काहीही करण्यापुर्वी तिच्याप्रमाणे आधी फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्या आणि मगच व्यायामाला सुरुवात करा.