Join us  

3 Rules Of Exercise: वर्कआऊट करूनही फायदा होत नाही? चुकतात 3 गोष्टी, व्यायामाचे फक्त 3 नियम, लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 12:39 PM

Fitness Tips: व्यायाम करणारे तर अनेक जण आहेत, पण समजून उमजून, सगळी माहिती घेऊन आणि नियम पाळून केलेला व्यायाम निश्चितच तुम्हाला अधिक फायद्याचा ठरेल (rules for improving fitness)... म्हणूनच तर वाचा व्यायामाचे ३ मुख्य नियम. 

ठळक मुद्देनियम पाळले तर नक्कीच तुमचा फिटनेस कितीतरी जास्त वाढला आहे, हे तुमचे तुम्हालाच जाणवू लागेल.

कोणतीही गोष्ट जर उत्तम पद्धतीने व्हावी, असं वाटत असेल, तर त्यासाठी काही नियम पाळावे लागतात, थोडीफार शिस्त लावावी लागते. तरच ती गोष्ट अधिक चांगली होते आणि आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. तसंच आपल्या व्यायामाचंही आहे. व्यायाम करताना जर काही गोष्टी लक्षात घेतल्या आणि फक्त ३ मुख्य नियम पाळले तर नक्कीच तुमचा फिटनेस कितीतरी जास्त वाढला (how to improve fitness) आहे, हे तुमचे तुम्हालाच जाणवू लागेल. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी या संदर्भातली एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रमावर शेअर (instagram share) केली असून व्यायाम करताना कोणते ३ नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

 

लक्षात ठेवा व्यायामाचे ३ मुख्य नियम (Rules for exercise)१. एकच एक व्यायाम नकोअनेक जणांचं व्यायामाचं रुटीन ठरलेलं असतं आणि तेच ते वर्षानूवर्षे फॉलो करत असतात. असं करणं अतिशय चुकीचं आहे. कारण यामुळे तुमच्या शरीराला नेहमीच एकसारखा व्यायाम करण्याची सवय लागून जाते आणि मग अपेक्षित फायदा मिळत नाही. स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्टॅबिलीटी, स्ट्रेचिंग हे चार 'S' फिटनेससाठी अतिशय आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या व्यायामांमधून तुम्हाला या चारही गोष्टी मिळतील, असे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या. व्यायाम प्रकारांमध्ये कायम बदल करा.

 

२. मोठा गॅप नकोकाही जणं खूप उत्साहात व्यायाम करतात. पण त्यानंतर मात्र खंड पडू लागतो. मग पुन्हा कधीतरी महिना- दोन महिन्यांनी व्यायामाला सुरुवात होते.. असं चक्र अनेक जणांचं सुरू असतं. पण यामुळे तुमचा फिटनेस मात्र खूप जास्त डिस्टर्ब होतो. त्यामुळे व्यायामात एक तर खंड पडू देऊच नका. जरी पडला तरी तो गॅप ३ आठवड्यांपेक्षा मोठा नसावा. अन्यथा तुमच्या शरीराने व्यायाम करून जो काही फिटनेस कमावला आहे, तो सगळा ३ आठवड्यांपेक्षा मोठा गॅप झाल्यास निघून जातो आणि शरीर पुर्वपदावर येते. 

 

३. व्यायामाचंही प्लॅनिंग करा...आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला रोज एकसुरी एकच एक व्यायाम नको आहे. त्यामुळे दर रविवारी तुम्ही पुढच्या सोमवार ते शनिवार या काळात काय व्यायाम करणार, किती वेळ करणार हे ठरवलं पाहिजे. आधीच्या आठवड्यापेक्षा निश्चितच तो व्यायाम वेगळा असावा. ज्याप्रमाणे फायनान्शियल प्लॅनिंग, एज्युकेशनल प्लॅनिंग, करिअर प्लॅनिंग महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे व्यायामाचं प्लॅनिंगही खूप आवश्यक आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायामइन्स्टाग्राम