वर्क फ्रॉम होम करताना काम करायला बसण्याची चुकीची पद्धत, उभे राहण्याची चुकीची सवय किंवा मग खूप जास्त ड्रायव्हिंग यामुळे खूप जणांची पाठ दुखत असते, मान अवघडून जाते... मग यावरचा सोपा उपाय म्हणजे त्यावर काहीतरी मलम लावला जातो आणि त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही दिवस आराम पडला की मग पुन्हा दुखणं सुरू होतं.. हे दुखणं कायमचं पाठीमागे लागू नये, यासाठी नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे..
सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) या सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्यांनी पाठ आणि मानदुखीसाठी काही व्यायाम सांगितले आहेत. त्या म्हणतात की पाठीच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पण पाठ- मानेच्या व्यायामांकडे दुर्लक्ष करून तुम्ही फिट राहू शकत नाही. त्यामुळेच काही व्यायाम नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. पाठीचे व्यायाम करताना स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, स्टॅमिना आणि स्ट्रेचिंग या चार गोष्टींवर भर देणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पाठीचं, मानेचं दुखणं मागे लागू नये यासाठी करा हे तीन व्यायाम..१. पहिल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी पोटावर झोपा. कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात सरळ पुढे करा. आता डोकं जमिनीवर टेकवून एक हात वर उचला. तीन मोजेपर्यंत हात वरच ठेवा. त्यानंतर तो हात खाली ठेवा आणि दुसरा हात उचला. तो हात देखील ३ आकडे मोजेपर्यंत तसाच ठेवा. एकेका हाताने ५- ५ वेळा असा व्यायाम करा. हात वर उचललेला असताना कपाळ जमिनीलाच टेकलेलं असू द्या.
२. दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करताना पोटावर झाेपा. दोन्ही हात पायाच्या बाजूनेच जमिनीला टेकवून ठेवा. हाताचे तळवे जमिनीला टेकतील, अशा पद्धतीने ते ठेवा. कपाळ जमिनीला टेकवा. आता एक पाय मांडीपर्यंत वर उचला. त्यानंतर तो पाय खाली टेकवून दुसरा पाय देखील मांडीपर्यंत वर उचला.
३. तिसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी दोन्ही गुडघे आणि दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवा. आता उजवा पाय सरळ रेषेत मागे करा आणि डावा हात सरळ रेषेत पुढे करा. ३ किंवा ५ आकडे मोजेपर्यंत ही अवस्था तशीच ठेवा. आता ही अवस्था सोडा आणि असेच आसन डावा पाय मागे करून आणि उजवा हात सरळ रेषेत पुढे करून करा.