Join us  

ब्रेस्ट ओघळल्याने फिगर खराब दिसते? ब्रेस्ट लिफ्टींगसाठी ३ सोपे व्यायाम, बांधा दिसेल सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 12:43 PM

3 Simple Exercise Useful For Breast Sagging : जाता-येता करता येतील असे सोपे व्यायामप्रकार...

स्तन हा स्त्रियांच्या शरीराला सुडौल करणारा महत्त्वाचा अवयव आहे. पण हे स्तन खूप मोठे असतील, लहान असतील किंवा खूप ओघळलेले असतील तर आपल्याला ओशाळल्यासारखे होते. स्तनांचा आकार आणि ठेवण चांगली असावी असं आपल्याला सारखं वाटतं. त्यामुळे आपण फॅशनेबल कपडे वापरुन आपले लूकही चांगले करु शकतो. खूप ओघळलेले स्तन दिसायला अतिशय वाईट दिसतात. त्यामुळेच स्तन ओघळू नयेत आणि ओघळले असतील तर ते पुन्हा पूर्ववत व्हावेत यासाठी काही किमान व्यायामांच फायदा होतो. द योगिनी वर्ल्ड या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून जूही कपूर यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी अतिशय सोपे आणि झटपट होतील असे ३ व्यायामप्रकार सांगितले आहेत. हे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास स्तनांची ठेवण सुधारण्यास नक्कीच मदत होते (3 Simple Exercise Useful For Breast Sagging). 

१. आर्म लिफ्ट 

गुडघ्यावर बसून हात जमिनीला समांतर ठेवायचे आणि एक एक हात खांद्यातून वर उचलायचा. असे केल्याने खांदे आणि छातीच्या आजुबाजूच्या सगळ्या स्नायूंना चांगला ताण पडतो आणि या स्नायुंमध्ये ताकद आल्याने ब्रेस्ट ओघळण्याचे प्रमाण कमी होते.  

२. चेस्ट विंडो

यामध्ये गुडघ्यावर बसायचे आणि दोन्ही हात जमिनीला समांतर राहतील असे पुढच्या बाजुला घ्यायचे. मग ते कोपरातून फोल्ड करुन आत-बाहेर आणि वर-खाली करायचे. यामुळे खांदे, छातीच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि ओघळलेले स्तन लिफ्ट होण्यास मदत होते. 

३. उष्ट्रासन 

आपण योगा करताना उष्ट्रासन करतो. पण त्यामध्ये आपण दोन्ही हात मागे नेऊन घोट्यांवर ठेवतो. मात्र ओघळलेले ब्रेस्ट व्यवस्थित दिसावेत यासाठी थोड्या वेगळ्या पद्धतीने उष्ट्रासन करायचे. म्हणजे एकावेळी एका बाजुच्या हाताने त्याच बाजुचा पाय पडकायचा पण त्यावेळी दुसरा हात वर  सरळ करायचा. असे वेगाने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.  

 ब्रेस्ट हा स्नायू नसून ते चरबीयुक्त असतात त्यामुळे ते टोन्ड असतातच असे नाही. पण त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या स्नायूंचे व्यायाम केल्याने ब्रेस्टचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायामाचा नक्की उपयोग होतो. व्यायामाने आपण स्तन सैल पडणे आपण लांबवू शकतो. तसेच या व्यायामांमुळे खांदे आणि छातीच्या स्नायूंमध्ये ताकद येते आणि त्यामुळे ब्रेस्टला चांगला आधार मिळण्यास मदत होते. यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेला प्रत्येक व्यायामप्रकार ३० वेळा असे ३ सेट करावेत. मात्र स्तन ओघळले असतील तरी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही असेही जूही कपूर सांगतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायाम