वाढलेलं वजन कमी करायचं असो किंवा कॅलरीज बर्न करायचं असो व्यायामाला पर्याय नाही असं आपण नेहमी म्हणतो. पण दिवसभराच्या रुटीनमध्ये हा व्यायाम काही केल्या मागेच पडतो. १ तारखेपासून किंवा सोमवारपासून व्यायाम सुरू करण्याचा संकल्प अनेकदा केला जातो खरा पण तो प्रत्यक्षात येणं हा मोठा टास्क असतो. तब्येत फिट ठेवायची तर व्यायामाला पर्याय नाही हे जरी खरं असलं तरी घर, ऑफीस इतर जबाबदाऱ्या सांभाळताना विशेषत: महिलांची तारांबळ उडते. अशावेळी पारंपरिक व्यायाम न करता काही वेगळ्या उपायांनी आपल्याला वाढलेल्या कॅलरीज घटवता आल्या किंवा वजन कमी करता आलं तर बरं नाही का...प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ व्हिक्टोरीया ब्रॅडी घरच्या घरी करता येतील असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे बाहेरही पडावं लागणार नाही आणि व्यायामही होईल असे कोणते उपाय सांगतात पाहूया...
१. डान्स
डान्स कऱणे आपल्यातील अनेकांना आवडणारी गोष्ट आहे. गणपती असो किंवा कोणाचे लग्न आपण सगळेच मनसोक्त नाचतो. हाच डान्स कॅलरीज बर्न करण्यासाठी अतिशय उत्तम उपाय असल्याचे ब्रॅडी म्हणतात. यासाठी कोणतीही उपकरणे तर लागत नाहीतच पण जीमची मेंबरशिपही घ्यावी लागत नाही. लागतात फक्त आपल्या आवडीची गाणी आणि थोडी जागा. घरातली मंडळी किंवा मित्रमैत्रीणी मिळून आपण नक्की डान्स करु शकतो. त्यामुळे मूडही फ्रेश व्हायला मदत होते.
२. ट्रंपोलिन
लहान मुलं पार्कमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावर आवर्जून ट्रम्पोलिनकडे धाव घेतात. त्यावर उड्या मारायला आणि बाऊन्स व्हायला त्यांना कायमच मजा येते. पण मज्जा वाटणारी ही गोष्ट व्यायाम म्हणूनही अतिशय महत्त्वाची असते. ट्रंपोलिनवर उड्या मारल्याने कॅलरीज टॉर्च होतात आणि मेटाबॉलिजम बूस्ट व्हायलाही मदत होते. यावर आपण व्यायाम करतो आहोत असे फिलिंग तर येत नाहीच पण ताकद वाढण्यासही याचा चांगला उपयोग होतो. यामुळे आपण मुलांसोबत खेळता खेळता व्यायाम करु शकतो त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले जातात.
३. बागकाम
बागकाम हा नेहमीच उत्तम व्यायाम ठरु शकतो. यासाठी आपल्याकडे थोडी मोठी जागा किंवा किमान गॅलरी असण्याची आवश्यकता आहे. बागकाम करताना माती खोदणे, रोपं लावणे यांसाठी बरीच उठबस करावी लागते. त्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच बागकामाध्ये शरीराच्या जवळपास सर्व अवयवांना काम पडत असल्याने या ठिकाणची चरबी जळण्यास मदत होते. बागकामामुळे नकळत आपण पर्यावरणाचेही रक्षण होत असल्याने यामध्येही एका गोष्टीत दोन हेतू साध्य होतात.