दिवसभराचं बैठं काम, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांमुळे शरीरावर चरबी वाढत जाते. काही जणांची वाढलेली चरबी पोटावर जमा होते तर काहींची मांड्यांवर. एकदा ही चरबी साठायला लागली की ती कमी करणे हे मोठे आव्हान असते. बसून बसून मांड्यांवर चरबी साठली की मांड्यांचा आकार शरीरापेक्षा मोठा होतो आणि शरीर बेढब दिसायला लागते. मग आपल्याला फॅशनेबल कपडे तर वापरता येत नाहीतच पण आरोग्याच्याही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी आपण जीमला जाणे, डाएट करणे असे एक ना अनेक उपाय करायला लागतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. मात्र नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. आता यासाठी नियमितपणे कोणते व्यायाम करायला हवेत याविषयी (3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs)...
१. उत्कटासन
हे आसन चेअर पोझ या नावानेही ओळखले जाते. हे आसन पाय, मांड्या आणि नितंब यांच्या स्नायूंसाठी उपयुक्त ठरते. या आसनात काल्पनिक खुर्चीत बसल्याने स्नायूंना नेहमीपेक्षा जास्त ताण येतो. यामध्ये पायांवर जोर येतो आणि नितंब आणि मांड्या यांच्यावरही ताण येतो आणि येथील चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे केवळ फॅट बर्न होतात असे नाही, तर पाय टोन होण्यासाठीही आणि मजबूत होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो.
२. वीरभद्रासन
दिसायल अतिशय सोपे दिसणारे मात्र करायला थोडे कठिण असलेले हे आसन आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घेऊन एका पायात काटकोनात वाकावे. असे दोन्ही पायांनी, दोन्ही बाजूला करावे. या आसनामुळे मांड्या, पाय, नितंब अशा सगळ्यांवर ताण येत असल्याने मांड्यांची चरबी नकळत कमी होते.
३. नटराजासन
बसून बसून मांड्या आखडल्या असतील तर मांड्यांचा व्यायाम होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. मांड्यांचे आतले आणि बाहेरच्या स्नायूंना यामुळे ताण पडतो आणि मांड्यांवर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे पायाच्या भागाचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.