कामाच्या पद्धती बदलल्यामुळे सध्या नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांना ८ ते १० तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम करावे लागते. काम करताना कितीतरी वेळ सलग एकाच जागी नजर खिळलेली असते. यामुळे डोळ्यांवर खूप जास्त ताण येतो. स्क्रिनवरचा प्रकाश कधीकधी डोळ्यांना खूपच बोचतो, खुपतो. पण काम केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी सध्या खूप जास्त वाढत आहेत. डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या म्हणजे केवळ चष्माच लागतो असे नाही. तर खूप जास्त स्क्रिन बघितल्यामुळे अनेकांना डोळे कोरडे होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळ्यांना खूप खाज येणे, सारखे डोळे चाेळावेसे वाटणे, डोके दुखणे, डोळ्यात आतमध्ये काहीतरी खुपते आहे, असे वाटणे असे वेगवेगळे त्रास जाणवत आहेत.
सध्या मुलांचे शिक्षणदेखील ऑनलाईन पद्धतीनेच होत असल्यामुळे मुलांनाही ४ ते ५ तास स्क्रिन बघावी लागते आहे. जितका वर्ग मोठा तितके स्क्रिन बघण्याचे प्रमाण जास्त असे मुलांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे इयत्ता ९ वीच्या पुढच्या बहुतांश मुलांना दिवसातून ७ ते ८ तास स्क्रिन बघावी लागते आहे. शिवाय अभ्यास किंवा ऑनलाईन क्लासेसची वेळ संपल्यानंतर अनेक मुलं टीव्ही बघण्यात किंवा मोबाईल बघण्यात वेळ घालवतात. त्यामुळे मुलांमध्ये तर स्क्रिन बघण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्क्रिन पाहिल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही काही योगासने करा. यामुळे डोळ्यांना चांगलाच आराम मिळेल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल.
डोळ्यांच्या फिटनेससाठी करा ही योगासने
१. हलासन
डोळ्यांसाठी हलासन अतिशय उपयुक्त आहे. हलासन करणे थोडे कठीण निश्चित आहे, परंतू दररोज योग्य सराव केला तर आठवडाभरातच उत्तम हलासन करता येईल. हलासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय एकत्रितपणे ९० अंशात वर उचला. यानंतर दोन्ही हात कंबरेखाली घ्या आणि कंबरेचा भाग देखील उचलण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय सावकाशपणे डोक्याच्या मागे घेऊन जा आणि पायाची बोटे जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला लगेचच पाय डोक्याच्या मागील भागावर असणाऱ्या जमिनीवर टेकणार नाहीत. पण नियमितपणे प्रयत्न केल्यास हे आसन नक्कीच जमू शकते. एकदा ही आसनस्थिती जमली की त्यानंतर ती ३० सेकंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
२. त्राटक
हा योग धारणेतील एक प्रकार आहे. दिव्याच्या मदतीने त्राटक करता येते. त्राटक करण्यासाठी दिवा किंवा मेणबत्ती पेटवा आणि ती डोळ्यांच्या अगदी सरळ रेषेत ठेवा. तुमची जेवढी उंची असेल, तेवढ्या फुट लांबीवर दिवा ठेवावा, असे सांगण्यात येते. तुमचे डोळे आणि दिवा एका समान पातळीवर असायला हवा, याची काळजी घ्या. यानंतर ध्यान मुद्रेत बसा. पाठीचा कणा ताठ ठेवून पायाचे अर्धपद्मासन घाला. यानंतर दोन्ही हातांच्या तर्जनीला दोन्ही हातांचे अंगठे लावा आणि अशी मुद्रा घालून हात गुडघ्यावर ठेवा. या ध्यानमुद्रेत बसून समोर दिसणाऱ्या दिव्याच्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. पापण्यांची हालचाल न करता एखादा मिनीट एकटक दिव्याकडे बघा. यानंतर थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा दोन- तीन वेळा दिव्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे नजर चांगली होते आणि डोळ्यांवरचा ताण हलका होतो.
३. समकोनासन
डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी समकोनासन करण्याचा सल्ला दिला जातो. समकोनासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात वर करा आणि हाताचे तळवे एकमेकांना जोडा. यानंतर कंबरेतून खाली वाका. तुमचे शरीर तुम्हाला ९० अंशात वाकवायचे आहे. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवा. मान खाली करा आणि डोळे जमिनीवर स्थिर ठेवा. या आसनस्थितीत ३० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.