असं म्हणतात की शरीर कमावण्यासाठी आणि तब्येत सुधारण्यासाठी हिवाळ्यासारखा उत्तम ऋतू नाही. म्हणून तर म्हणतात ना, की थंडीच्या दिवसात सकाळी- सकाळी अंगावर पांघरूण ओढून झोपून राहू नका. सकाळी लवकर उठा आणि भरपूर व्यायाम करून फिट रहा..आता थंडीमध्ये सकाळची झोप आणि पांघरून सोडवत नाही, हे शंभर टक्के खरं. पण एकदा सुरूवात करून तर पहा...
हिवाळ्यामध्ये बाहेरच्या थंड वातावरणात स्वत:ला टिकवून ठेवायचं असेल, तर आपलं शरीर उबदार ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच तर हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण सुकामेवा, डिंकाचे लाडू, उडीदाचे लाडू, मेथ्याचे लाडू असे अनेक पदार्थ आवर्जून खात असतो. काही योगासनांमध्येही आपले शरीर उबदार ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळेच तर थंडीच्या दिवसात प्रत्येकाने ही ३ योगासने आवर्जून केलीच पाहिजेत. या योगासनांमुळे शरीर उबदार राहते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे आपण सर्दी, खोकला, पडसे, शिंका, नाक गळणे यासारख्या संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चे संरक्षण करू शकतो. त्यामुळे ही काही योगासने हिवाळ्यात आवर्जून कराच.
१. नौकासन
फुफ्फुसे, श्वसनसंस्था आणि आतड्यांना मजबूत करण्याचं काम नौकासनाद्वारे केलं जातं. थंडीच्या दिवसांत सगळ्यात जास्त बाधित होते ती श्वसनसंस्था. म्हणूनच नियमितपणे नौकासन करा. नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता ३० डिग्री अंशावर उचला. यानंतर दोन्ही हात समोरच्या दिशेने ठेवून हात आणि मान उचला. या आसनात तुमच्या शरीराचा आकार एखाद्या नौकेप्रमाणे म्हणजेच जहाजाप्रमाणे होतो. नौकासन केल्यानंतर कमीतकमी ३० सेकंद तरी आसनस्थिती ठेवावी.
२. शिर्षासन
शिर्षासन हा आसनप्रकार सगळ्यात अवघड मानला जातो. पण थोडा सराव केला तर शिर्षासन जमू शकते. शिर्षासन केल्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह अधिक उत्तमप्रकारे प्रवाहीत होतो. रक्ताभिसरण उत्तम होऊ लागले की शरीराचे तापमानही वाढते आणि शरीर उबदार होते. असं म्हणतात की संपूर्ण शरीराचा व्यायाम होण्यासाठी शिर्षासनासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. म्हणूनच तर शिर्षासन करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच शिर्षासन करा.
३. सेतूबंधासन
हे आसन नियमितपणे केल्यास पचनक्रिया सुधारते. तसेच हिवाळ्यात अनेक जणींना पाठ आणि कंबरदुखी खूप जास्त प्रमाणात जाणवू लागते. या आसनामुळे पाठ आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. हे आसन केल्यानंतर शरीराचा आकार एखाद्या पुलाप्रमाणे दिसतो म्हणून याला सेतूबंधासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवा. त्यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. आता केवळ डोके आणि मान जमिनीवर टेकलेली असू द्या आणि संपूर्ण शरीर वर उचला. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा.