Join us  

व्यायाम करताना लक्षात ठेवण्याचे ४ नियम, चूक झाली तर व्यायामाचा उपयोग शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 7:54 PM

4 Rules To Remember While Exercising : Exercising The Right Way : व्यायाम कधी करायचा, कसा करायचा, किती वेळ, प्रकार कोणता याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं.

आजच्या काळात प्रत्येकालाच फिट राहायला आवडते. म्हणूनच लोक जिमिंग आणि हेल्दी डाएट पाळून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून एक चांगली जीवनशैली अंगीकारून फिट राहू शकतात. आपल्यापैकी बरेच लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटिजचा समावेश दैनंदिन आयुष्यात करतात. आपापली कामं पूर्ण करताना आरोग्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्याची घडी योग्य बसवण्यासाठी फार मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही.

जीवनशैलीत काही मोजके बदल केल्याने आपले आरोग्य उत्तम राहू शकतं. शरीरात ऊर्जा कायम राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणं, झोपेच्या वेळा पाळणं यासोबतच व्यायाम करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. व्यायाम करण्यासोबतच व्यायाम करण्याची वेळ, पद्धती, प्रकार, कालावधी यांसारख्या विविध गोष्टींकडे देखील लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदिक डॉक्टर, नितिका कोहली यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून आयुर्वेदानुसार व्यायाम करण्याची योग्य वेळ, कालावधी, पद्धती कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे(4 Rules To Remember While Exercising : Exercising The Right Way). 

आयुर्वेदानुसार व्यायामाचे मुख्य ४ नियम :-    

१. व्यायाम करण्याची उत्तम वेळ :- आयुर्वेदानुसार, सकाळी ६ वाजल्यापासून ते १० वाजल्यापर्यंतचा काळ हा व्यायाम करण्यासाठी फार फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार, उत्तम आरोग्य आणि चांगली शारीरिक बळकटी मिळविण्यासाठी हा उत्तम काळ असतो. संध्याकाळची वेळ ही रिलॅक्स आणि शरीरासाठी विश्रांती घेण्यासाठीची योग्य वेळ असते.       

२. व्यायामाचा कालावधी आणि तीव्रता :- डॉक्टर कोहली यांच्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या शरीराच्या ५०% क्षमतेने दिवसातून किमान १५ मिनिटे ते अर्धा तास व्यायाम करू शकतो. आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस ठरवून त्या दिवसांत किमान १५ मिनिटांपासून ते १ तासापर्यंत व्यायाम करु शकता. आपल्या संपूर्ण शारीरिक क्षमतेच्या अर्धे म्हणजेच ५०% क्षमतेने व्यायाम करणे म्हणजेच निरोगी व्यायाम असे आयुर्वेदशास्त्रात मानले जाते. पूर्ण शक्ती वापरुन व्यायाम केल्यानंतर दोन दिवसांकरिता स्नायू किंवा अंग दुखणं, ही सामान्य बाब आहे. पण, ही अंगदुखी दोन दिवसांहून अधिक काळ राहिल्यास ते चांगलं लक्षण नाही. अशा वेळी इतक्या जास्त प्रमाणात व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी योग्य नाही हे समजून घ्या. त्यामुळे पुरेसा आराम करा आणि व्यायामाचं प्रमाण आटोक्यात ठेवा.

३. वर्कआऊट केव्हा थांबवायचे :- 'अति तिथे माती' हा नियम व्यायामाच्या बाबतीतसुद्धा लागू होतोच. अतिव्यायामाचा आपल्या एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात व्यायाम करत राहिलात तर आरोग्य सुधारणार नाही. याउलट, आरोग्य ढासळत जाण्याची शक्यता वाढेल. आपल्या  अतिव्यायामाचा हृदयावर परिणाम होण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. रक्तदाब कमी होणं, श्वासोच्छ्वासात अनियमितता अशा समस्या उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्या. जर आपण हाय - इंटेंसिटी वर्कआऊट करत असाल तर वर्कआऊट दरम्यान छोटे - छोटे ब्रेक घ्यावेत. "सुरुवातीच्या काळात हळुहळु वर्कआऊट करावे. जसजसे आपला स्टॅमिना वाढेल तसे वर्कआऊट करण्याचा काळ वाढवत न्यावा". असे आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात.    

४. व्यायामाचे तीन स्तंभ :- आयुर्वेदानुसार व्यायामाचे तीन मुख्य स्तंभ आहेत. १. शारीरिक ताकद (Strength) - यामध्ये सूर्यनमस्कार, वेट ट्रेनिंग यांसारख्या वर्कआऊटचा समावेश होतो. २. शारीरिक लवचिकता (Flexibility) - यामध्ये योगा व स्ट्रेचिंग यांसारख्या वर्कआऊटचा समावेश होतो. ३. शारीरिक क्षमता (Endurance) -  यामध्ये जॉगिंग, सायकलिंग, फास्ट वॉकिंग, स्विमिंग यांसारख्या वर्कआऊटचा समावेश होतो.   आयुर्वेदानुसार व्यायामातील या सर्वोत्कृष्ट पद्धतींमुळे आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात त्याचबरोबर आपले आरोग्यही सुधारण्यास व मजबूत होण्यास मदत मिळते.

टॅग्स :फिटनेस टिप्स