आपल्या शरीराचा बहुतांश भार हा आपल्या हाडांवर असतो. आपली हाडं ठणठणीत असतील तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नाहीतर सतत काही ना काही दुखण्याच्या तक्रारी सुरूच राहतात. अनेकदा हाडं ठिसूळ झाल्याने पायदुखी, पाठदुखी किंवा गुडघेदुखी अशा समस्या भेडसावत असल्याचे आपण आपल्या आजुबाजूला पाहतो. मात्र असे होऊ नये आणि दिर्घकाळ आपली हाडे मजबूत राहावीत यासाठी आधीपासूनच योग्य ती काळजी घ्यायला हवी. योगासने हा यावरील एक उत्तम उपाय असून नियमितपणे काही योगासने केल्यास हाडे चांगली राहण्यास मदत होते. आता ही आसने नेमकी कोणती आणि ती कशी करायची ते पाहूयात (4 Yoga for Good Bone Health)...
१. वीरभद्रासन
दोन्ही पायांत जवळपास ४ फुटांचे अंतर घेऊन उजवा पाय उजव्या बाजूला वळवायचा. या पायाचा ९० अंशाचा कोन करुन दोन्ही हात जमिनीला समांतर राहतील असे ठेवा. यामध्ये हात, पाय, कंबर, मांडी अशा सगळ्या स्नायूंना व्यायाम होतो. हे आसन नियमित केल्यास हाडे लवचिक राहण्यास मदत होते. त्यामुळे हे आसन दोन्ही बाजुने नियमितपणे करावे.
२. वृक्षासन
दोन्ही पायांवर सरळ उभे राहिल्यानंतर एका पायाचे पाऊल दुसऱ्या पायाच्या जांघेत लावावे. यामध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दोन्ही हातांचा डोक्यावर नमस्कार घालावा. किमान १० सेकंद या आसनामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करावा.
३. सेतुबंध सर्वांगासन
पाठीवर झोपून पाय गुडघ्यात वाकवून सीटच्या बाजूला आणावेत. दोन्ही हातांनी टाचा पकडाव्यात आणि कंबर आणि पाठीचा भाग वरच्या दिशेला उचलावा. यामध्ये डोकं, मान, खांदे, पायाचे तळवे आणि हात जमिनीला टेकलेले राहतात आणि पाठीचा पूर्ण भाग वर उचललेला राहतो, त्यामुळे शरीराला ताण पडतो आणि हाडे चांगली राहण्यास मदत होते.
४. शवासन
पाठीवर पूर्णपणे झोपा. पायांत अंतर घेऊन दोन्ही पाऊले बाहेरच्या बाजूला पसरा. हातांमध्येही अंतर घेऊन हात हलके सोडायचा प्रयत्न करा. डोके कोणत्याही एका बाजुला घेऊन संपूर्ण शरीर हलके सोडायचा प्रयत्न करा. श्वासावर लक्ष केंद्रित करुन १० मिनीटे याच आसनात राहा. यामुळे शरीर रिलॅक्स व्हायला मदत होईल.