Join us  

पोट कमी करण्याची चिंता पण लिव्हरचं काय? रोज करा ४ योगासनं, लिव्हर राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 1:21 PM

4 Yoga Sana For Healthy Liver : समस्या झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा आधीपासूनच योग्य ती काळजी घेतलेली चांगली...

शरीरात जमा होणारी घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी लिव्हर म्हणजेच यकृत महत्त्वाचे कार्य करते. मात्र यकृताच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर मात्र शरीरात हे अनावश्यक घटक जमा होतात आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. यकृताचा आजार कधी अनुवांशिक असतो तर कधी मद्यपान,लठ्ठपणा यांमुळेही यकृताच्या कामात बिघाड होतो. यकृत निकामी झाल्यास अशक्तपणा येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, वजन झपाट्याने कमी होणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात. याचे गंभीर परीणाम म्हणजे लिव्हर सोरायसिस, लिव्हरचा कर्करोग यांसारख्या समस्या गंभीर रुप धारण करतात (4 Yoga sana For Healthy Liver). 

यासाठी आपला आहारविहार, व्यायाम, झोप हे सगळे व्यवस्थित असणे आवश्यक असते. अन्यथा एक वेळ अशी येते की काही ना काही कारणाने आपल्याला शारीरिक तक्रारी उद्भवतात आणि मग काही गोष्टी आपल्या हातात न राहता डॉक्टरांवर सोपवाव्या लागतात. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहित असते मात्र काही ना काही कारणाने आपल्याकडून व्यायामाकडे दुर्लक्ष होते. पण लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवायचे असेल तर काही योगासने नियमीत केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात ही योगासने कोणती आणि ती कशी करायची. 

(Image : Freepik)

१. धनुरासन

पोटावर झोपून दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडायचे आणि शरीराचा धनुष्यासारखा आकार करायचा. यामध्ये हात, पाय, पोट आणि पाठ अशा शरीराच्या बहुतांश स्नायूंना ताण पडतो. या आसनामुळे लिव्हर मजबूत होण्यास मदत होते. 

२. भुजंगासन

करायला अतिशय सोपे वाटणारे पण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले हे आसन आपण नियमितपणे करायला हवे. हे आसन नियमित ५ मिनीटे केल्यास लिव्हर सिरोसिस आणि फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. अधोमुख श्वानासन

काही कारणांनी लिव्हरला सूज येण्याची शक्यता असेल तर ती शक्यता या आसनाने नियंत्रणात येऊ शकते. इतरही अनेक गोष्टींसाठी हे आसन फायदेशीर असल्याने आपल्या फिटनेस रुटीनमध्ये या आसनाचा जरुर समावेश करायला हवा.

४. अनुलोम-विलोम आणि कपालभाती

अनुलोम विलोम आणि कपालभाती हे प्राणायमाचे प्रकार असून शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत व्हावा यासाठी तो फायदेशीर असतो. अनुलोम विलोम आणि कपालभातीमुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो आणि लिव्हरचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.   

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स