Join us  

पर्वतासन करण्याचे ५ फायदे, आसन दिसते सोपे पण रोज १ मिनिटात देते भरपूर ताकद..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 4:33 PM

Parvatasana Benefits of Yoga अत्यंत साधे दिसणारे हे पर्वतासन आपल्या शरीराला अनेक फायदे देणारे आहे. हे आसन केल्याने पूर्ण शरीराला लाभ मिळतो

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग खूप फायदेशीर आहे. योगासनाचे विविध प्रकार शरीरातील अवयवांना अधिक बल देते. सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, असा सल्ला कायमच डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येतो. परंतु, मनाचे आरोग्य जपण्यासाठी योग अत्यंत महत्वाचे काम करते. योगासनाचे विविध योग करून आपण मनाला शांती आणि शरीराला देखील एक नवी उर्जा देऊ शकतो. आज आपण पर्वतासन या योग संदर्भात माहिती घेणार आहोत. हे आसन करताना आपल्या शरीराची आकृती पर्वताप्रमाणे बनते. अत्यंत साधे दिसणारे हे आसन आपल्या शरीराला अनेक फायदे देणारे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसाचे आणि पोटाचे विकार नाहीसे होतात. पाठदुखीसाठी एक चांगला उपाय म्हणून आपण हे आसन करू शकतो. या आसनामध्ये शरीराचा समतोल साधला जातो त्याचाच फायदा मन एकाग्र करण्यासाठी होतो. यासह या आसनामुळे सांध्याच्या समस्या दूर होतात, स्नायू लवचिक होतात आणि हात पाय देखील मजबूत होतात.

पर्वतासन योग कसा केला जातो

प्रथम आपल्या आसनावर पद्मासनात बसावे. दोन्ही हातांचा नमस्कार करून छातीजवळ ठेवा. जोडलेले दोन्ही हात हळू हळू डोक्याच्या वर न्या. आपल्या दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांना चिपकलेली राहतील, तसेच दोन्ही हात आपल्या कानांना चिटकतील आणी सरळवरती ताठ राहतील कोपऱ्यामध्ये वाकणार नाहीत याची काळजी घ्या. दोन्ही हात वर नेताना श्वास आत घ्या. हात वरती ताणल्या गेल्यावर काही वेळासाठी श्वास रोखून धरा.आता हळू हळू दोन्ही हात खाली आणा. हात खाली आणताना हळू हळू श्वास सोडा. या आसनाचा ४ ते ५ वेळा सराव करावा. जेणेकरून या आसनाचा योग्य लाभ आपणास मिळेल.

पर्वतासन करण्याचे फायदे 

या आसनाच्या नियमित सरावामुळे हातांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो. 

पाठीच्या मणक्याला ताण पडून त्याला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे तेथील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत चालते. 

या आसनाच्या नियमित सरावामुळे मणक्या विषयी असलेल्या सर्व तक्रारी  जसे पाठदुखी, कंबरदुखी, मानेचा त्रास दूर होतो. 

या आसनाच्या सरावामुळे आपल्या श्वसन यंत्रणेचा भरपूर व्यायाम होतो त्यामुळे दम्यासारखे आजार होत नाहीत. 

छातीचा भाग सुडौल बनतो. 

ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात.

स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर वक्षस्थळामध्ये आलेला ढिलेपणा कमी करण्यासाठी व त्यांची मूळ स्थिती प्राप्त करण्यासाठी या आसनाचा फार चांगला उपयोग होतो. म्हणूनच स्त्रिया व वयात येणाऱ्या मुलींकरिता हे आसन फार उपयोगी आहे.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स