Join us  

सर्वांगासन करण्याचे 5 फायदे, आसन वाटतं अवघड पण शिकून घेतलं तर करायला सोपं, तब्येतीला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 4:17 PM

संपूर्ण शरीराला फायदे मिळवून देणारं सर्वांगासन 5 कारणांसाठी अवश्य करावं.. सर्वांगासन करण्याची पध्दत घ्या शिकून !

ठळक मुद्देहदयाच्या आरोग्यासाठी सर्वांगासन महत्वाचं आसन आहे.सर्वांगासनामुळे थायराॅइड ग्रंथी व्यवस्थित काम करतात. निरोगी शरीरासोबतच शांत मनासाठी सर्वांगासन करणं फायदेशीर. 

निरोगी राहाण्यासाठी योग साधनेचं महत्व अनन्यसाधारण आहे. आजार दूर ठेवण्यासाठी आणि झालेले आजार बरे करण्यासाठी योगसाधना अवश्य करण्याचा सल्ला दिला जातो. योगसाधनेत विविध आसनांचा समावेश आहे. प्रत्येक आसनाचा शरीराच्या विशिष्ट अवयवाला विशिष्ट फायदा होतो. पण योगसाधनेत सर्वांगासन हे आसन असं आहे ज्याचा संपूर्ण शरीराला फायदा होतो. नियमित सर्वांगासन केल्यानं शरीर-मनाला अनेक फायदे होतात. 

Image: Google

सर्वांगासन

हे आसन करताना शरीराच्या सर्व अंगांचा समावेश होतो. तसेच या आसनानं शरीराच्या जवळ जवळ सर्व अवयवांना फायदा होतो म्हणून हे सर्वांगासन. सर्वांगासन नियमित केल्यास शरीराची चयापचय क्रिया सुधारते, त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो. सर्वांगासनामुळे पोट कमी होतं.  सर्वांगासनामुळे पाय, मांड्या, कुल्ले येथील स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. 

Image: Google

सर्वांगासन का करावं

1. व्हेरीकोज व्हेन्सच्या समस्येत सर्वांगासन केल्याचा फायदा होतो. निष्क्रिय आणि बैठी जीवनशैली, खूप वेळ उभं राहाणं, गरोदरावस्था या कारणानं व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होतो. या त्रासात पायाकडील नसा सूजतात, वाकड्या तिकड्या होतात. सर्वांगासन केल्यानं व्हेरीकोज व्हेन्सच्या त्रासानं पायाला आलेली सूज कमी होते.  सर्वांगासन हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द दिशेने केले जाते. त्यामुळे रक्त प्रवाह हा उलट्या दिशेनं होवून रक्ताचा निर्माण झालेला दाब मोकळा होतो. 

2. योनीमार्ग आणि प्रजनन संस्थेचं कार्य उत्तम होण्यासाठी सर्वांगासनाचा फायदा होतो. सर्वांगासन करताना पाय वरच्या दिशेने असतात . शरीर उलट्या दिशेनं सरळ असतं. यामुळे रक्तप्रवाह ओटीपोटाकडील स्नायूंना ( पेल्विक मसल्स) होतो. यामुळे गर्भाशयात रक्ताच्या/ पाण्याच्या गाठी होणे ( सिस्ट) , पीसीओडी समस्यांचा धोका कमी होतो. 

3. सर्वांगासन हदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आसन आहे. सर्वांगासनामुळे हदयातील सर्व भागाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होतो. हदयावर येणारा ताण, दाब या आसनामुळे कमी होतो. सर्वांगासनामुळे हदयाचे स्नायू मजबूत होतात. हदयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो.  पण तज्ज्ञ सांगतात की ज्यांच्या हदयावर किंवा हदयाशी संबंधित शस्त्रक्रिया झालेल्या आहेत त्यांनी सर्वांगासन करु नये. 

4. सुदृढ राहाण्यासाठी थायराॅइड ग्रंथींचं काम व्यवस्थित चालणं आवश्यक आहे. थायराॅइड ग्रंथीतून टी3, टी4 आणि टीएसएच नावाचे 3 हार्मोन्स स्त्रवतात. हे हार्मोन्स चयापचय क्रिया, शरीराचा विकास यात या हार्मोन्सची भूमिका महत्वाची असते. सर्वांगसामुळे थायराॅइड शुध्द रक्ताचा पुरवठा होतो . यामुळे थायराॅइड ग्रंथी कार्यक्षमतेनं काम करतात. 

5. मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी सर्वांगासन हे उत्तम व्यायाम आहे. सर्वांगासानचा फायदा थायराॅइड ग्रंथींचं काम उत्तम होण्यास होतो. यातून तणाव कमी करनारं एंडोर्फिन नावाचं हार्मोन स्त्रवतं. मनात सतत नकारात्मक विचार येणे, मेंद आणि शरीराला सतत थकवा येणं, सकाळी उठल्या उठल्या आळस वाटणं या समस्यांमध्ये सर्वांगासन करणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

सर्वांगासन कसं करावं?

सर्वांगासन करण्यासाठी जमिनीवर ताठ झोपावं. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, जमिनीला टेकलेले असावेत. दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय आणि कंबर वर उचलावी. दोन्ही  हातांनी पाठीला आधार द्यावा. पाय वरच्या दिशेनं सरळ ठेवावेत. शरीराच सर्व भार खांद्यांवर असावा. सर्वांगासनात खांदे, डोकं आणि पाय एका सरळ रेषेत असतात. या अवस्थेत मंद श्वसन सुरु ठेवावं. जेवढी क्षमत आहे तेवढा वेळ या आसनात राहावं. सुरुवातीला सामान्यत: अर्धा ते एक मिनिट या आसनात राहाता येतं.  आसन सोडताना पाय एकदम जमिनीला टेकवू नये. आधी पाठ आणि कंबर जमिनीला टेकवावी आणि मग पाय हळूवार जमिनीला टेकवावेत.

सर्वांगासन हे फायदेशीर असलं तरी  ते करण्याचे काही नियमही आहेत. मान दुखत असल्यास, मानेशी निगडित काही आजार असल्यास सर्वांगासन करु नये. जुलाब होत असल्यास, डोकेदुखी, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास सर्वांगासन करु नये. सर्वांगासन व्यवस्थित शिकून मग त्याचा सराव करावा. सर्वांगासन करताना शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त जोर लावू नये. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स