व्यायामाला वेळच नसणे, ही अनेक महिलांची तक्रार. काही जणींच्या बाबतीत ही सबब असली, तर बहुतांश महिलांच्या बाबतीत खरोखरंच व्यायामासाठी वेळ मिळणं अवघड होऊन जातं. वर्किंग वुमन असेल तर तिच्या वेळा आणखीनच कठीण असतात. मुलांचे शाळा, कॉलेज, नवऱ्याचे ऑफिस, घरातली इतर मंडळी यांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय करून तिला घराबाहेर पडावं लागतं. दिवसभर ऑफिसचं काम झालं की रात्री पुन्हा तेच सगळं... अशा धावपळीत दिवस कसा संपतो, तेच कळत नाही. मग व्यायामासाठी निवांत वेळ मिळायचा कसा?(best exercise in minimum time)
बहुतांश महिलांचा हाच प्रश्न सोपा करून टाकणारं हे एक खास उत्तर बघा. व्यायाम करायचा म्हणजे मग तो अगदी अर्धा पाऊण तासाचा निवांत वेळ काढूनच करायला हवा, हे सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका. तुमच्याकडे असणाऱ्या ८- १० मिनिटांचा योग्य वापर करा आणि हे ५ व्यायाम करा. हे ५ व्यायाम असे आहेत, जे प्रत्येक महिलेने करायलाच हवेत. अगदी पाळीतले वेगवेगळे त्रास कमी करण्यापासून ते रक्तदाब आणि वजन नियंत्रित ठेवण्यापर्यंत अनेक समस्यांवर हे व्यायाम प्रभावी ठरतात. त्यामुळे तुमची धावपळ होते ते मान्य आहे, पण तरीही स्वत:ला फिट ठेवायचं असेल तर १० मिनिटे स्वत:ला द्या आणि हे काही व्यायाम करा. हा उपाय yogaastha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
प्रत्येकीने करायलाच पाहिजेत ही ५ आसनं
१. बद्धकोनासन आणि बटरफ्लाय
- प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांना मजबूत करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
- या आसनामुळे मांडी आणि हिप्सवरील चरबी कमी होण्यास मदत होते.
- मासिक पाळीमध्ये होणारा खूप रक्तस्त्राव किंवा पोटदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आसन.
- या आसनामुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.
- मेनोपॉजसंबंधी तक्रारीही या आसनामुळे कमी होतात.
२. मलासन
- पेल्व्हिक मसल्स मजबुत होण्यासाठी उपयुक्त आसन
- कंबरदुखीचा त्रास होत असल्यास हे आसन फायदेशीर ठरते.
- मासिक पाळीमध्ये पोटामध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा त्रास होत असल्यास तो मलासन नियमित केल्याने कमी होतो.
- गुडघे आणि पायाच्या जॉईंट्सची ताकद वाढविण्यासाठी उपयुक्त व्यायाम.
३. शिशुआसन
- पचनशक्ती सुधारते
- वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास हे आसन करणे फायद्याचे ठरते.
- मन रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त आसन
- कंबरदुखी असल्यास कंबरेचं योग्य प्रकारे स्ट्रेचिंग होऊन त्रास कमी होतो.
४. अधोमुखासन
- शरीरातील रक्ताभिसरण सुधारते
- मांडी, हिप्स आणि पोटऱ्यांवरील चरबी कमी होण्यासाठी उपयुक्त आसन
- मेंदूला उत्तमप्रकारे रक्तपुरवठा हाेतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आसन
- दंडांवरील चरबी कमी हाेण्यास उपयुक्त
- हाताच्या आणि पायाच्या जॉईंट्सच्या मजबुतीसाठी उत्तम व्यायाम.
५. मार्जरासन
- कंबरदुखी, पाठदुखी हा त्रास अनेक महिलांना जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी उत्तम आसन.
- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढविण्यासाठी फायदेशीर
- मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त