Join us  

घरकामामुळे व्यायामाला वेळच नाही? जाता-येता होणारे ५ सोपे स्ट्रेचेस, शरीर राहील कायम लवचिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2023 2:19 PM

5 Easy Stretches For Busy Women's Fitness Tips : योग प्रशिक्षक काम्या हे स्ट्रेचेस कोणते आणि ते कसे करायचे याबाबत सांगतात...

सकाळी झोपेतून उठल्यापासून आपल्यासमोर कामाचा डोंगर असतो. रात्री झोपतानाच आपली सकाळच्या कामांची यादी सुरू होते. झोपेतून उठल्यावर आपण स्वत:चे आवरण्याच्या आधी नाश्त्याला काय करायचे, स्वयंपाक काय करायचा याचा विचार करतो आणि साफसफाईची पारोशी कामं उरकायला लागतो. लहान मुलं असतील तर त्यांच्या डब्याची तयारी, नाश्ता, चहा-पाणी हे सगळे करता करता आपले आवरुन ऑफीसला निघण्याची वेळ कधी येते कळतच नाही. मग ऑफीसला जाण्यासाठीचा प्रवास, पोहोचल्यावर तिथल्या कामांची यादी आणि मग कदी दिवस संपून घरी जातो याची घाई. संध्याकाळी घरी पोहोचलो की पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक आणि आवराआवरी (5 Easy Stretches For Busy Women's Fitness Tips). 

हे चक्र दिवसेंदिवस चालूच राहतं. यामध्ये आपल्याला स्वत:कडे आरशात शांतपणे बघायलाही अनेकदा वेळ मिळत नाही, तर व्यायामासारख्या गोष्टी तर खूप दूर राहिल्या. व्यायाम केला नाही तर आरोग्यावर त्याचे विपरीत परीणाम होतात. कामं म्हणजे व्यायाम नाही आणि आपल्याला व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. अशावेळी स्वयंपाकघरात काम करता करता ओटा, भिंत यांचा आधार घेऊन काही सोपे स्ट्रेचेस केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. यामुळे स्नायू लवचिक राहण्यास मदत होते आणि नकळत आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो. इन्स्टाग्रामवर योग प्रशिक्षक काम्या हे स्ट्रेचेस कोणते आणि ते कसे करायचे याबाबत सांगतात...

(Image : Freepik)

१. किचन ओट्याच्या आधाराने स्ट्रेचिंग 

ओट्यावर हाताचे तळवे ठेवायचे आणि ओट्यापासून काही अंतर दूर उभे राहायचे. कंबरेतून खाली वाकून शरीर काटकोनात येईल असे पाहायचे. यामुळे खांदे आणि मणक्याला योग्य तो ताण मिळण्यास मदत होते. विशेषत: मणका शांत झाला की आपलं डोकंही शांत होतं. 

२. उभ्याने मार्जारासन

संपूर्ण पाठ, खांदे यांना ताण पडण्यासाठी मार्जारासन हा उत्तम उपाय आहे. दोन्ही हात आणि गुडघे यांच्यावर बसून हे आसन करणे शक्य नसल्यास उभ्यानेच हात डोक्याच्या मागच्या बाजूला घेऊन हे आसन केल्यास फायदा होतो. पाठदुखी कमी होण्यासाठी आणि दिवसभराचा ताण दूर होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

३. फेशियल मसल स्ट्रेच 

तोंडात पाणी घेऊन ते तसेच धरुन ठेवावे. यामुळे चेहऱ्याचे स्नायू ताणले जाऊन रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्वचेचा ग्लो वाढण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास हा उत्तम व्यायाम आहे. चेहरा काही कारणाने फुगल्यासारखा दिसत असेल तर हा व्यायाम उत्तम उपाय आहे. 

४. ताडासन

पाय टाचेतून उचलणे आणि हात वरच्या दिशेला ताणणे म्हणजेच ताडासन हा उत्तम उपाय आहे. यामुळे आपले पोश्चर सुधारण्यास मदत होते. सायटिकाची समस्या, रक्तप्रवाह सुरळीत होणे, स्नायू बळकट होणे, पाठ, कंबरेचा भाग आणि पायांमध्ये ताकद येण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

५. बॅलन्स

एक पाय गुडघ्यातून छातीच्या दिशेने वाकवून एका पायावर बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करावा. तसेच दुसऱ्या बाजुनेही करावे. यामुळे स्नायू जास्त चांगल्यारितीने काम करु शकतात. तसेच रोजचे व्यवहार करणे यामुळे सोपे होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम