दिवसभर ऑफीसचे काम, त्यामुळे एकाच जागी, एका पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान, खांदे आणि पाठदुखीचा त्रास उद्भवतो. सतत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आणि मोबाईल यांच्या वापरामुळे खांदा आणि मानेचा भाग तर कधी कधी अक्षरश: बधिर होतो. बैठे काम असल्याने ते आरामदायी असते असे जरी आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नसते. कामाच्या नादात आपल्याला हे दुखणे लक्षात येत नाही, पण नंतर ते इतके वाढते की ते सहन न होण्याइतके असते.या दुखण्याचे गंभीर परीणाम म्हणजे व्हर्टीगो आणि सर्व्हायकल स्पॉंडीलायसिस होण्याची शक्यता असते.मात्र हे दुखणे वाढू नये आणि त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्यात यासाठी काही सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी खांदेदुखीचा त्रास कमी व्हावा यासाठी काही सोपे व्यायामप्रकार सांगतात ते कोणते आणि कसे करायचे पाहूया (5 Easy Yoga poses for Shoulder Pain by Fitness Expert Anshuka Parwani)...
१. बेल्टचा वापर
योगा बेल्ट किंवा कोणत्याही प्रकारचा बेल्टचा वापर करुन हा व्यायाम करता येतो. दोन्ही हातांमध्ये बेल्ट धरुन हात पुढून डोक्यावरुन मागे न्यावेत. पुन्हा पुढे आणावेत आणि पुन्हा मागे न्यावेत. किमान १० वेळा तरी हातांची अशाप्रकारे हालचाल केल्यास आखडलेले खांदे मोकळे होण्यास मदत होते.
२. पपी पोझ
कुत्र्याचे पिल्लू ज्याप्रमाणे दोन पाय पुढे करुन शरीराला ताण देते त्याचप्रमाणे शरीराला ताण द्यायला हवा.योगा ब्लॉकवर दोन्ही हातांचे कोपरे ठेवून गुडघ्यावर बसून शरीर मागच्या बाजूला ताणावे. जास्त ताण हवा असेल तर पाय सरळ मागे केले तरी चालतात. यामुळे खांद्यांना ताण पडतो आणि खांदेदुखी कमी होण्यास मदत होते.
३. उष्ट्रासन
या आसनात कंबरेतून मागे वाकून दोन्ही हाताने टाचा धरल्याने पाठ, खांदे, कंबर, मान अशा सगळ्याच अवयवांना ताण पडतो. दिवसभर सतत उभे राहून किंवा बैठे काम केल्याने महिलांना पाठदुखी, खांदेदुखीचा त्रास जास्त जाणवतो. त्यासाठी हेआसन अतिशय उत्तम आहे.शक्य तितका वेळ हे आसन होल्ड करण्याचा प्रयत्न करावा.
४. मार्जारासन
पाठीच्या मणक्याला मार्जारासन या व्यायामामुळे अतिशय चांगले वंगण मिळण्यास मदत होते. दिवसभर पाठ, खांदे एकाच पोझिशनमध्ये असतील तर ती मांजरीसारखी वर खाली केल्याने मणका लवचिक राहण्यास मदत होते.
५. बसून खांदे ओपन करणे
आपण हाताने कोणतेही काम करताना साधारणपणे हात पुढच्या दिशेला नेऊन काम करतो. त्यामुळे हातांची एका विशिष्ट पद्धतीनेच हालचाल होत राहते. पण त्यातील स्नायूंमध्ये ताकद राहावी यासाठी हात मागच्या बाजूला नेणेही तितकेच महत्त्वाचे असते. खाली बसून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत. त्यानंतर हात जमिनीवरच मागे न्यावेत आणि छाती पुढे काढून या अवस्थेत साधारण १ ते ३ मिनीटे थांबण्याचा प्रयत्न करावा.