व्यायाम कधी टाळावा किंवा करु नये हा खरं तर प्रश्नच होऊ शकत नाही. व्यायाम न करण्याची शंभर खोटी कारणं आपण स्वत:ला आणि इतरांनाही सांगत असतो. रोज नवनवीन कारणं सांगून व्यायाम टाळतो. खरंतर खोटी कारणं देऊन व्यायाम टाळण्याचा तोटाच होतो. पण कोणतीही परिस्थिती असो, मागे कितीही कामाचे व्याप असोत पण न कुरकुरता व्यायाम करणारे अनेक जण आहेत. ती शिस्त आवश्यकच असते.
नियमित व्यायाम या एका गोष्टीनं शरीराचं बिघडलेलं तंत्र सुधारू शकतं. मन आणि शरीर कायम उत्साही राहातं, रात्रीची झोप चांगली लागते, कामाला ऊर्जा मिळते. व्यायामानं रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते.
मात्र तरीही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. त्यामुळे व्यायाम रोज करावा हे मान्य, पण व्यायाम कधी करू नये हे आपल्याला माहिती असलेलं बरं. तब्येतीचा विचार व्यायामासह आरामसह करायला हवा.
व्यायाम कधी टाळावा?
१. प्रदूषण खूप असेल, सकाळी जमलं नसेल तर ट्राफिक सुरु झाल्यावर रस्त्यावरुन पळत जाणं टाळावं. अशा वातावरणात व्यायाम करताना केवळ हवाच आपल्या शरीरात जात नाहीतर हवेतील प्रदूषित घटकही जातात. व्यायाम करताना तोंडावाटे श्वास घेतला जातो. तेव्हा हवेतील प्रदूषित घटक तो तोंडावाटे थेट फुप्फुसात जातात. ज्यामुळे कफ आणि वारंवार जंतूसंसर्गाचा त्रस होऊ शकतो. प्रदूषित हवेत व्यायाम केल्यानं फुप्फुसाला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रदूषित हवेत व्यायाम करणं टाळायला हवं.
२. थोडंसं सर्दी पडसं झालेलं असताना व्यायाम करण्यात धोका नसतो. पण अंगात ताप असताना व्यायाम करणं चुकीचं ठरतं. अशा परिस्थितीत व्यायाम केल्यानं शरीरातलं पाणी कमी होतं. श्वसन नलिकेला संसर्ग झाल्याचा परिणाम म्हणून ताप आलेला असेल तर व्यायाम करणं योग्य नाही.
३. दम्याचा किंवा अस्थम्याचा त्रास खूप होताना व्यायाम करणं टाळायला हवं. औषधोपचारांनी ज्यांचा दमा नियंत्रित असतो ते इतर कोणाही सामान्य माणसासारखा व्यायाम करू शकतात. पण अचानक थंड हवेत व्यायाम करताना हवेतील प्रदूषित घटकांशी संपर्क येऊन ज्यांना दम्याचा त्रास होतो त्यांनी व्यायाम करताना विशेष काळजी घ्यायला हवी. अतिकष्टाचा व्यायाम टाळून व्यायामाचे सौम्य प्रकार करायला हवेत.
४. अंगदुखी खूपच असेल तर व्यायाम न करता, थोडा आराम करायला हरकत नाही.
५. आजारपणानंतर किंवा काही कारणांनी एका मोठ्या अवकाशानंतर व्यायाम करताना थोडं सबुरीनं घ्यावं. किंवा बरीच वर्षे व्यायाम करत नसाल आणि एकदम सुरु केला तर व्यायाम करताना किमान दोन तीन आठवडे हळूहळू व्यायाम करावा. मग व्यायामाचा वेग वाढवावा.