बसण्याची- उभं राहण्याची चुकीची पद्धत, दुचाकीचा वाढलेला वापर आणि त्यात रस्त्यांवर असणारे खड्डे, व्यायामाचा अभाव आणि आहारातून योग्य पोषण न मिळाल्याने हाडांची होणारी झीज अशा अनेक कारणांमुळे सध्या कंबरदुखीचा त्रास खूप वाढला आहे. अनेक महिलांमध्ये तर पहिल्या बाळंतपणानंतर कंबरदुखी सुरू झालेली दिसून येते. अशा कोणत्याही कारणाने कंबर दुखत असली तर लगेच मनाने पेनकिलर गोळी घेणं टाळलं पाहिजे. त्याऐवजी काही घरगुती उपाय किंवा व्यायाम करणं कधीही अधिक उत्तम. म्हणूनच कंबरदुखी कमी करण्यासाठी हे काही उपाय (home remedies to reduce backpain) करून बघा. फरक पडतच नसेल आणि कंबरदुखी खूप जास्त असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही अधिक उत्तम.(Perfect yoga for lower back pain)
कंबरदुखी कमी करण्यासाठी उपाय१. तिशीनंतर अनेक महिलांना कंबर दुखण्याचा त्रास सुरु होतो. दिवसभर काम करून रात्री अंथरुणात अंग टाकलं की मग तर कंबरदुखी जरा जास्तच जाणवू लागते. अशावेळी हा एक उपाय करा आणि कंबरेला आधार देण्याचा प्रयत्न करा. यासाठी एक पातळ नॅपकीन वापरा. ते गोल- गोल गुंडाळून त्याची गुंडाळी करा. बेडवर पाठीवर झोपा. झोपल्यानंतर कंबरेच्या खालच्या भागावर एक उंचवटा जाणवतो. त्याठिकाणी ही नॅपकीनची गुंडाळी ठेवा. ५- ७ मिनिटे अशा पद्धतीने गुंडाळी ठेवल्यावर कंबरेला आराम वाटेल.२. खोबरेल तेल थोडं गरम करा. त्यात कापूर चुरून टाका. आता हे गरम तेल कंबरेवर चोळून हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखी कमी होईल.
३. कंबरदुखी वारंवार होत असेल तर एकदा ब्लड टेस्ट करून रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण तसेच व्हिटॅमिन डी ३ चं प्रमाण तपासून घ्या. या दोन घटकांची कमतरता असेल तरीही कायमच कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ, केळी, सुकामेवा, डाळी, पालेभाज्या यांचं प्रमाण वाढवा.४. कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांनी कधीही कंबरेतून खाली वाकू नये. खाली वाकून एखादी वस्तू उचलण्याची वेळ आली तर आधी गुडघे वाकवून पाठीचा कणा ताठ ठेवून खाली बसा, ती वस्तू उचला आणि नंतर त्याच जसे खाली बसलात, त्याच पोझिशनमध्ये उभे रहा. तसेच कंबरेतून खाली वाकून ओझे उचलणेही टाळावे.५. उभे राहताना अनेक जणांना एका पायावर शरीराचा भार देऊन उभे राहण्याची सवय असते. कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर ते भार टाकतात. खूपच क्वचितवेळा त्यांच्या दोन्ही पायांवर शरीराचा समान भार असतो. असं एका पायावर उभं राहण्याची सवय देखील कंबरदुखीसाठी कारण ठरू शकते.
कंबरदुखी कमी करण्यासाठी योगासन - नियमित थोडा व्यायाम करूनही कंबरदुखी कमी करता येते.- यासाठी भुजंगासन, अधोमुख श्वानासन, सेतूबंधासन ही काही आसने उपयुक्त ठरतात.- पण ही आसने करण्यापुर्वी एकदा योगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.