Join us  

दिवसभराचा थकवा जाण्यासाठी झोपताना ५ मिनिटे करा स्ट्रेचिंगचे ५ प्रकार, लागेल गाढ झोप, वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 5:38 PM

5 Super Relaxing Yoga Poses in Bed : पाहूयात अगदी ५ मिनीटांत होणाऱ्या ५ सुपर रिलॅक्सिंग योगा पोझेस..

सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीपरयंत आपण नुसते धावत राहतो. डोक्यात कामांची यादी सुरू असते आणि दुसरीकडे रोजची आवराआवरी, स्वयंपाक, ऑफीस, प्रवास हे सगळंही सुरूच असतं. या सगळ्यात आपल्याला व्यायामाला वेळ होतोच असे नाही. पण फ्रेश राहण्यासाठी थोडंफार चालणं, योगा, ध्यान असं काहीतरी करायला हवं हे आपल्याला माहित असतं, पण त्यासाठीही वेळ होतोच असे नाही. दुपारनंतर आपल्यातले त्राण कमी कमी होत जातात आणि आपण थकतो. अनेकदा इतके दमायला होते की रात्री गादीवर पडलो तरी शांत झोप लागत नाही. कधी कधी अंगदुखी होते, तर कधी मन शांत वाटत नाही. अशावेळी रात्री झोपताना काही सोपे स्ट्रेचेस केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात अगदी ५ मिनीटांत होणाऱ्या ५ सुपर रिलॅक्सिंग योगा पोझेस (5 Super Relaxing Yoga Poses in Bed)..

(Image : Google)

१. हॅपी बेबी

पाठीवर झोपून दोन्ही पाय वर करुन पायाचे घोटे हाताने धरायचे आणि पाठीवर रोल व्हायचे. यामुळे पाठीचे दुखणे कमी होते. हृदयाचा वेग कमी होण्यास, ताण-भिती कमी होण्यास, थकवा दूर होण्यास आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास याचा चांगला फायदा होतो.

२. पाय भिंतीला लावून ठेवणे 

पाठीवर झोपून पाय भिंतीला लावून शरीर काटकोनात राहील असे पाहावे. यामुळे रिलॅक्स वाटते, ताण कमी होतो. पाय, पावले, कंबरेचा भाग आणि गुडघ्याला आलेला ताण कमी होण्यास याची चांगली मदत होते. 

३. कपोतासन

एक पाय गुडघ्यात आणि मांडीत दुमडून दुसरा पाय मागे पसरायचा. कंबरेतून खाली वाकून डोकं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच लवचिकपणा आणि प्रजननक्रिया चांगली होण्यासाठीही या आसनाचा उपयोग होतो. 

४. मार्जारासन 

हातापासून मान, पाठीचा मणका, कंबर, पाय या सगळ्यांचा चांगला व्यायाम व्हावा यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. मांजर ज्याप्रमाणे एकदा पाठ खाली आणि एकदा वर करते त्याचप्रमाणे हे आसन केल्यास मणका चांगला राहतो. 

५. पश्चिमोत्तानासन

पाय सरळ ठेवून मांडीवर उशी ठेवायची आणि हाताने पायाचे तळवे धरायचा प्रयत्न करायचा. उशीवर रिलॅक्स डोके ठेवले तरी खाली वाकल्यामुळे मणक्याला आणि पायाच्या स्नायूंनाही ताण पडतो आणि स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे