वृषाली जोशी-ढोके
विज्ञानाने असंख्य सुखसोयी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे शारीरिक श्रम कमी झाले पण मानसिक श्रम, ते का वाढले याचा काही आपण विचार करत नाही. मात्र आधुनिक जगण्यात मानसिक ताण, स्पर्धा, इर्षा, द्वेष, यामध्ये वाढ झाली. आहार विहारात बदल झाले. निसर्गाच्या नियमांची पायमल्ली होऊ लागली. पैसा कमावण्याच्या नादात माणूस नुसता धावतो आहे. मात्र परिस्थितीने अगतिकही झाला. ही परिस्थिती बदलता येत नसेल तर आपण बदलायला हवे. आपण शोधायला हवा जगण्यात आनंद. त्यासाठी योगाभ्यासाला सुरुवात करायला हवी, बदलत्या परिस्थितीला आपण नियमित योगाभ्यास करून तोंड देऊ शकतो. योगाभ्यासाने शारीरिक, बौद्धिक मानसिक अशा सर्व पातळीवरच्या क्षमता वाढतात. सर्व अवयवांच्या कार्यात संतुलन निर्माण होते. सांध्यांच्या परिपूर्ण हालचाली झाल्याने आरोग्य चांगले राहते. मानसिक स्वास्थ्य सहजगत्या प्राप्त होते.
आरोग्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले, शरीराला कोणताही त्रास नाही म्हणजे तो व्यक्ती खूप फिट आहे असा मापदंड झाला आहे. हा मापदंड शारीरिक पातळीवर झाला पण मानसिक आरोग्याचे काय? मन प्रसन्न करण्यासाठीच तर आज योगअभ्यास जगभर सुरू आहे. योग ही उपचार पद्धती नाही तर कैवल्य, समाधी हे योगाचे उद्दिष्ट आहे. योग ही आत्मिक विकासाची साधना आहे. बरेच जण आज एक विशिष्ट व्याधी घेऊन येतात आणि विचारतात अमुक एक व्याधी आहे तर कोणते योगासने करू कोणता प्राणायाम करू. व्याधी मुक्ती साठी विशिष्ट योगाभ्यास करता येतोच पण हे लक्षात घेणे आधी महत्त्वाचे आहे की आपण निरोगी राहण्यासाठी आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाभ्यास करणे जरूरीचे आहे.
योगोपचाराची भूमिका -
आधी आणि व्याधी असे दोन शब्द आहेत
आधी निर्मिती - आपले मन हे अतिशय चंचल आहे, त्यात सतत विचारांचे द्वंद चालू असते त्यामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि या बिघडलेल्या मनस्थितीत विपरीत कृती अर्थात विकृती निर्माण होते.
व्याधी निर्मिती - आपल्या शरीरात प्रत्येक पेशीला प्राणशक्ती (ऑक्सिजन) पुरवणाऱ्या नाड्या आहेत. मनाच्या असंतुलनामळे या ऑक्सिजनचे अयोग्य वहन होते आणि मग आपली पचनशक्ती बिघडते. त्यामुळे विकार वाढतात. हे सगळं टाळण्यासाठी मनातील विचारधारा चांगली हवी. मन सत्वगुणी करणे अत्यावश्यक. त्या साठी काही गोष्टी टाळायलाच हव्यात. ते केलं तर योग करुन निरोगी होण्याकडे आपण वाटचाल करू शकू..
१. चुकीच्या सवयी, अयोग्य आहार.
२. आपल्या आसपासचे नकारात्मक वातावरण आणि नकारात्मक लोकांचा सहवास.
३.मनाला आणि शरीराला अपायकारक गोष्टी.
४. रात्रीचे जागरण, सकाळी उशिरा उठणे, दिवसा झोपणे.
५.चुकीच्या इच्छा आणि अयोग्य विचार.
( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)