डायबिटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबिटीस असतो. एकदा डायबिटीस मागे लागला की तो नियंत्रणात ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. कारण डायबिटीस ही शरीरात अतिशय हळूवारपणे पसरणारी समस्या आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर विविध अवयवांवर त्याचा परीणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे, औषधोपचार करणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. व्यायामामध्ये चालणे, जिम, सायकलिंग, योगा असा कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपण करु शकतो. रक्तातील साखर कमी होण्यासाठी काही ठराविक आसने नियमितपणे केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. योगतज्ज्ञ देवयानी यांनी ही आसनं सांगितली असून ती कोणती ते पाहूया (5 yoga asanas to control blood sugar levels)..
१. ताडासन
हात वरच्या दिशेला एकमेकांना जोडून हात आणि पायातून वरच्या दिशेने स्वत:ला ताणायचे. शरीराला यामध्ये स्ट्रेचिंग होते तसेच सर्व स्नायूंना चांगला ताण पडतो. करायला अतिशय सोपे असलेले हे आसन आपण उभ्या उभ्या कुठेही करु शकतो.
२. जानुशिर्षासन
दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचे. एक पाय जांघेत दुमडायचा. जो पाय लांब आहे त्या बाजुच्या हाताने त्याच पायाचा तळवा पकडायचा. डोके गुडघ्याला लावायचा प्रयत्न करुन हाताच्या वरच्या बाजुने पायाचा तळवा धरण्याचा प्रयत्न करायचा.
३. उष्ट्रासन
वज्रासनात बसून मांड्या वर उचलायच्या. मागच्या बाजुला वाकून हाताने पायाचे घोटे किंवा टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा. मान मागे टाकायची. यामुळे शरीराच्या सर्व स्नायूंना चांगलाच ताण पडण्यास मदत होते.
४. मार्जारासन
पाठीचा मणका, खांदे आणि हात यांचा व्यायाम व्हावा असे वाटत असेल तर मार्जारासन हे अतिशय उत्तम आसन आहे. मांजरीप्रमाणे पाठ वर-खाली केल्याने सगळे स्नायू ताणले जातात. दिवसभर बैठे काम केल्याने ज्यांना पाठ, कंबर यांना ताण येतो अशांसाठी हे आसन उत्तम आहे.
५. हलासन
पाठीवर झोपून कंबरेतून पाय वरच्या दिशेला न्यायचे. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू खालच्या बाजूला नेत जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे असते. दोन्ही पाय खाली टेकवल्यावर डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.