स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक जण मैदानी खेळ खेळायला जणू विसरत चालला आहे. पूर्वी मुलं कबड्डी, खो - खो, लपा छपी, दोरी उडी हे खेळ प्रचंड खेळायचे. मात्र, आजकालची लहान मुलं मैदानी खेळ विसरत चालले आहे, तर त्याजागी व्हिडिओ गेम्स खेळण्याचा छंद त्यांना लागला आहे. व्हिडिओ गेम्स आणि स्मार्ट फोनच्या नादात मुलं लट्ठ होत चालले आहेत. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.
लहान मुलांसह मोठी लोकं देखील स्मार्ट फोनच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक, यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं महत्वाचं. आपण लहानपणी दोरी उडी खेळली असेल. यातून नकळत आपल्या आरोग्यावर अनेक फायदे झालेत. लहान मुलांसाठी हा खेळ जरी असला तरी मोठ्यांसाठी हा व्यायामच म्हणावं लागेल. दोरी उडीमुळे शरीराला अनेक फायदे होतात.
दोरी उडी मारण्याचे फायदे
दोरी उडी मारण्याच्या क्रियेत आपल्या शरीराच्या खालच्या भागाचा समावेश होतो. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. सतत दोरी उडी मारल्यामुळे हृदयाची गती वाढते. यासह फुफ्फुसाची क्षमता सुधारते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज अर्धा तास दोरी उडी मारणे खूप फायदेशीर ठरू शकते. खालच्या भागावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दोरी उडी हा बेस्ट व्यायाम मानला जातो.
एकदा का आपल्याला दोरी उडी मारण्याची सवय लागली की, हा व्यायाम मजेशीर वाटू लागतो. सर्वप्रथम, नियमित ३० सेकंद वार्म अप करा त्यानंतर ३० सेकंद विश्रांती घ्या मग दोरी उडीचे तीन सेट पूर्ण करा.
दररोज दहा मिनिटे दोरी उडी मारल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे हृदयाच्या निगडीत अधिक समस्या उद्भवत नाहीत.
दोरी उड्या मारल्याने हाडे मजबूत होतात आणि संतुलनामध्ये लक्ष केंद्रित करते.
नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.