Join us  

भुजंगासन करण्याचे 8 फायदे; दुखणाऱ्या पाठीसाठी, वाढलेलं पोट कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 4:15 PM

वजन कमी करण्याच्या उपयांमधला प्रभावी उपाय म्हणजे भुजंगासन. पोट कमी करुन वजन नियंत्रित ठेवणाऱ्या या व्यायामाचे 8 फायदे प्रभावी व्यायाम प्रकार. 

ठळक मुद्देभुजंगासनाचा मुख्य परिणाम हा पोटाच्या आणि पाठीच्या स्नायुंवर होतो.पोट कमी करण्यासोबतच संपूर्ण शरीराचं वजन नियंत्रित करण्याचं काम भुजंगासन करतं.शारीरिक आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीत भुजंगासन करण्याचा फायदा होतो. 

योगसाधनेतील प्रत्येक आसनाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. भुजंगासन हे योगसाधनेतील एक आसन असून या आसनाचे अनेक फायदे होतात. सूर्य नमस्कारातही भुजंगासनाचा समावेश आहे. भुजंगासनाचा मुख्य परिणाम हा पोटाच्या आणि पाठीच्या स्नायुंवर होतो. भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू सक्रीय होतात तर पाठीचे स्नायू मजबूत होतात. भुजंगासनामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी भुजंगासन करण्याला विशेष महत्व आहे. 

Image: Google

भुजंगासन का करावं?

1. नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फाॅर्मेशन'ने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात पोट कमी करण्यास मदत करणाऱ्या अनेक आसनांचा उल्लेख केलेला आहे. यात भुजंगासनाचाही समावेश आहे. भुजंगासनावर झालेला अभ्यास सांगतो, की या आसनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे वाढलेलं पोट कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो.

2. भुजंगासन करताना पोट ताणलेलं असताना चालू असलेल्या मंद श्वसनाचा उपयोग फुप्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. या आसनामुळे फुप्फुसं मजबूत होतात.

3. भुजंगासन हा एक स्ट्रेचिंग व्यायाम आहे. हे आसन केल्यानं शरीरात ताण निर्माण होतो. अभ्यास सांगतो, की ताण निर्माण करणाऱ्या व्यायामामुळे खांदे, पाठ आणि मान या अवयवांना आराम मिळतो. खाडे आणि मानेवर आलेला ताण घालवण्यासाठी भुजंगासन परिणामकारक ठरतं. पाठीचे स्नायू मजबूत आणि लवचिक करण्याचं काम भुजंगासन करतं. 

4. भुजंगासन करताना नितंबाच्या स्नायुंचा देखील वापर होतो. नितंबाचे स्नायू खेचले जातात. पण नितंबाचे स्नायु दुखत असतील तर  त्या परिस्थितीत भुजंगासन करु नये असं तज्ज्ञ म्हणतात.  

Image: Google

5. शरीरात चयापचयाची क्रिया बिघडली तर किडनी विकार, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या निर्माण होतात. भुजंगासनामुळे चयापचयाची क्रिया सुधारते. शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळेच किडनी आणि यकृताचं काम सुरळीत ठेवण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो.

6.  भुजंगासन केल्यानं पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे वाढलेलं पोट नियमित भुजंगासन केल्यानं कमी होतं. तसेच संपूर्ण शरीराचं वजन नियंत्रित करण्याचं काम भुजंगासन करतं. म्हणूनच वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये भुजंगासन करण्याचा समावेश झालेला आहे.

7. शारीरिक आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीत भुजंगासन हे लाभदायक ठरतं. भुजंगासनाच्या फायद्यांवर झालेला अभ्यास सांगतो, की भुजंगासन केल्यानं शारीरिक आणि मानसिक थकवा, अशक्तपण कमी , डोकेदुखी या समस्या दूर होतात. तसेच चिंता या मानसिक समस्येवरही भुजंगासनाचा फायदा होतो. 

8. सायटिका, दमा यासरख्या आरोग्य समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो. दम्याची लक्षणं कमी करण्यासाठी भुजंगासनाचा फायदा होतो.

Image: Google

कसं करावं भुजंगासन?

भुजंगासन जर योग्य पध्दतीनं केलं तरच त्याचा शारीरिक आणि मानसिक त्रासावर लाभ होतो. भुजंगासन करताना पोटावर झोपावं. दोन्ही पाय जवळ जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवून ठेवावेत.  हनुवटी जमिनीला टेकलेली असावी.  लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठावं. नजर वर छताकडे ठेवावी.  

भुजंगासन करताना  मान, छाती, पोट यावर ताण येतो. दोन्ही हात ताठ ठेवल्याने हाताच्या आणि खांद्यांच्या स्नायुंवर ताण येतो. मान वर करुन छताकडे पाहिल्याने मानेवर ताण येतो.  भुजंगासनात सुरुवातीला अर्धा मिनिट राहावं. या आसनात श्वास रोखून ठेवू नये. मंद श्वसन सुरु ठेवावं. या आसनाचा सराव झाल्यावर आसनात राहाण्याचा कालावधी अर्ध्या मिनिटावरुन एक मिनिटापर्यंत वाढवता येतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेवेट लॉस टिप्स