धावपळीच्या जीवनात आजकाल शरीर सुदृढ ठेवणे कठीण होऊन बसले आहे. बैठी कामे करणाऱ्या लोकांना तर दिवसभर बसून काम करावे लागते. त्यामुळे तब्बेतीची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडू नये. फार काही कष्ट न घेता या ९ सवयी लावून घेतल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. ९ ना सही निदान नवीन वर्षात आपण एक किंवा दोन सवयी स्वत:ला लावून घेत आरोग्य उत्तम राखायलाच हवं.
गुंजन शाउटस् या पेजने एक सोपा आणि छान दिनक्रम सांगितला आहे. या प्लॅनचे नाईन टू वन रुल असे नाव आहे.९ ते १ असं उलट्या गिनतीने काही गोष्टी करायच्या आहेत. ९. ९ म्हणजे ९००० पाऊले चाला. एवढे चालण्यासाठी जास्तीत जास्त दोन तास लागतात. चालणे हा फार सोपा आणि गुणकारी उपाय आहे. ८. ८ म्हणजे रोज कमीत कमी आठ मोठे ग्लास भरुन पाणी प्या. शरीरासाठी पाणी फार गरजेचे असते. कमी पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होतात. ७.रोज रात्री ७ तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे. ही झोप न झाल्यास मेंदूची कार्यक्षमता मंदावते. शारीरिक थकवा जाणवतो. शरीर पुढील दिवसासाठी सज्ज होत नाही.
६.रोज किमान ६ मिनिटे शांतपणे ध्यानस्थ बसावे. असे केल्याने ताणतणाव, वैचारिक, तळमळ कमी होते. मन विचलित न होता डोकेसुद्धा शांत राहते. ५.दिवसातून पाच वेळा फळांचे सेवन करा. फळे खाणे शरीरासाठी उपयुक्त असते. फळांचे सेवन केल्याने पोट शांत राहते. तसेच अपौष्टिक पदार्थं खाण्याची इच्छा कमी होते.
४. काम कितीही असले तरी दिवसातून चार वेळा ब्रेक घ्यावा. डोक्याला शरीराला थोडावेळ आराम द्या. फेरफटका मारा किंवा डोळे बंद करून बसा. मात्र असे छोटे ब्रेक नक्की घ्या.
३.दिवसातून तीन वेळा व्यवस्थित आहार घ्या. आहारात भाज्या, धान्ये, डाळी आदी शरीरासाठी पोषक असलेल्या गोष्टींचा समावेश असावा. या व्यतिरिक्त दिवसातून तीनदा थोडे-थोडे स्नॅक्स खावे. २.रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका किंवा आडवे पडू नका. दोन तासांचा कालावधी मधे जाऊ द्या. पचनेंद्रियांना त्यांचे काम व्यवस्थित पार पडण्यास मदत होईल. १. कोणतीही एक शारीरिक क्रिया न चुकता दररोज करा. एखादा खेळ खेळू शकता. सायकलींग करू शकता. जीम लाऊ शकता. मात्र ते नियमित करा.