आपल्या शरीरात असा कोणता तरी अवयव असतो, त्याला परफेक्ट बनवण्यासाठी आपण अधिक परिश्रम घेतो. वयानुसार पोटामध्ये बदल दिसून येतात. काही कारणास्तव काहींचे पोट पुढे येते. या लटकलेल्या पोटामुळे काही लोकांची पँट पोटावर चढता चढत नाही. काहींचे पोट सैल कपड्यात देखील दिसून येते. लठ्ठपणा ही आजच्या काळातील सर्वात गंभीर समस्या बनली आहे.
वजन कमी करण्यासाठी आपण अनेक मार्ग शोधतो, डाएट, व्यायाम, योगा या गोष्टी त्यात आल्यातच. पोट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार हवा. या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे द्यायला वेळ नसतो. अशा परिस्थितीत घरामध्ये करण्यासारखे ५ व्यायाम पाहा. याच्या नियमित सरावामुळे पोटातील अतिरिक्त चरबी नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
लेग रेज वर्कआऊट
अॅब्स आणि फ्लॅट टमीसाठी लेग रेज हा व्यायाम उत्तम मानला जातो. लेग रेज हा स्ट्रेंथ व्यायाम आहे. हा व्यायाम बहुतेक वेळा रेक्टस एबडोमिनिस स्नायू अंतर्गत आणि इनर-एक्सटर्नल ऑब्लिक मसल्स मजबूत करण्यासाठी केला जातो. हा व्यायाम प्रामुख्याने लोअर एब्सला ट्रेन करते. ज्यामुळे लटकलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर सरळ झोपा. आपले हात सरळ ठेवा. यानंतर कोर घट्ट करा. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून पाय एकत्र चिकटवा. आता पंजांना ओढत पाय वर करा. हा व्यायाम करताना पाय खाली जमिनीला स्पर्श करू नयेत याची काळजी घ्या. याला तुमचा एक रेप्स म्हटला जाईल. ही प्रक्रिया १० वेळा करा.
क्रंच एक्सरसाइज
क्रंच एक्सरसाइज हा व्यायाम ट्रेनर आवर्जून करण्यास सांगतात. हा व्यायाम पोटासाठी फायदेशीर ठरतो. व्यायामशाळेत जाणारे यासह खेळाडूंमध्ये क्रंच व्यायाम सर्वात लोकप्रिय आहे. पाठीवर झोपून केला जाणारा हा व्यायाम करणे सोपे तर आहेच शिवाय त्याचा फायदा लवकर होतो. या व्यायामाद्वारे पोटाचे स्नायू घट्ट करण्यासोबतच वजनही कमी करता येते. यासाठी सर्वप्रथम, पाठीवर झोपा आणि आपले पाय जमिनीवर पसरवा. यानंतर गुडघे वाकवा आणि कोपर वाकवताना हात छातीवर ठेवा. आता श्वास सोडताना डोके आणि छाती वर करा. नंतर श्वास घेताना पूर्वीच्या स्थितीत या. ही प्रक्रिया १० वेळा करा.
बायसाईकल क्रंच
चटईवर झोपा, दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडून डोक्याच्या मागे ठेवा आणि दोन्ही पाय किंचित वर करा. यानंतर उजवा पाय छातीच्या दिशेने गुडघ्यापासून वाकवा आणि डोके वर उचलून डावीकडे वळवा. आता डाव्या कोपराने उजव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की तुमचे हात एकमेकांशी जोडलेले असावेत आणि डावा पाय सरळ असावा. यानंतर, डावा पाय गुडघ्यापासून वाकवा आणि उजव्या कोपराने डाव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया १० वेळा करा.
ऑबलिग क्रंच
सर्वप्रथम, मॅटवर उजव्या पायाचा गुडघा खाली टेकवून शरीर उभे ठेवा. डावा पाय समोरच्या दिशेने ठेवा. यासह डावा हात कमरेवर ठेवा. आता हात वर करून यासह पोट दोन्ही डाव्या दिशेने वाकवा. याच प्रमाणे डावा पाय मागे आणि उजवा पाय पुढे ठेऊन हात आणि पोट उजव्या दिशेने वाकवा. याने पोटावरील साईड फॅट्स कमी होतील. ही प्रक्रिया १० वेळा करा. याने लवकर फरक दिसेल.
फ्लटर किक
फ्लटर किक हा व्यायाम प्रकार अतिशय सोपा आहे. याने पोटावरील अतिरिक्त चरबी करण्यास मदत होईल. यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा. पाय सरळ ठेवा आणि दोन्ही तळहात मांडीखाली ठेवा. उजवा पाय सरळ रेषेत जमिनीवरून उचला. गुडघ्यामध्ये वाकवू नका. जमिनीपासून साधारण ४५ डिग्री कोनात पाय उचला. नंतर तो पाय खाली करा आणि त्याचवेळी डावा पाय उचलून जमिनीपासून ४५ डिग्री कोनात घ्या. अशा पद्धतीने एका नंतर एक दोन्ही पायांची जलद गतीने हालचाल करा. ही प्रक्रिया १० वेळा करा. उत्तम रिझल्टसाठी आपण या ५ व्यायामाचे नियमित ३ सेट करू शकता.